कोणत्या कारणांमुळे हॉटेल्रवर होते कारवाई, अन्न आणि औषध प्रशासनाकडून घ्या जाणून !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 09:03 PM2019-02-07T21:03:56+5:302019-02-07T21:05:59+5:30
पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे.
पुणे : हॉटेलमध्ये जायला सगळ्यांनाच आवडते. पण जिथे पैसे मोजून आपण खायला जातो त्या ठिकाणी जर आरोग्याची हेळसांड होईल असे अन्न दिले जात असेल आणि तरीही तुम्ही त्याच ठिकाणी जायला उत्सुक असाल तर आरोग्यासोबत केलेला अक्षम्य गुन्हा आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा आणि स्वच्छ आणि योग्य दर्जा असलेल्या हॉटेल्समध्येच जा. याच हॉटेल आणि रेस्टोरन्टच्या दर्जावर लक्ष ठेवते ते अन्न आणि औषध प्रशासन. पुण्यातही गेल्या काही दिवसांपासून अशा कारवाया सुरु असून अनेक नामवंत हॉटेल आणि रेस्टोरंटचा यात समावेश आहे. मात्र या कारवाईमागे नेमकी काय कारणे असतात जे लोकमतने अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडून माहिती घेतली.
प्रश्न : हॉटेलवर कारवाईचे प्रमाण बघता त्यासाठी नेमके कोणते निकष लावले जातात ?
उत्तर : लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून व्यवसाय करणाऱ्या हॉटेलवर आम्ही कारवाई करतो. सर्वसाधारणपणे स्वच्छता, स्वयंपाकघरातील वातावरण, कामगारांचे आरोग्य, त्यांचे वेळेत केलेले लसीकरण, कच्च्या मालाची योग्य साठवणून या आणि अशा मुद्द्यांवर तपासणी केली जाते. दुसरा मुद्दा म्हणजे संबंधित व्यावसायिकांकडे परवाना आहे का, त्याचे नूतनीकरण केले आहे का याचीही पडताळणी होते. याशिवाय वापरण्यात येणारे दूध, पनीर किंवा तत्सम दुग्धजन्य पदार्थ योग्य तापमानात ठेवले आहेत का हेदेखील बघितले जाते.
प्रश्न : ग्राहकाने कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे?
उत्तर : हा मुद्दा सर्वांत महत्वाचा आहे. जर ग्राहकाने स्वच्छतेची मागणी केली तर व्यावसायिक ते देणे गरजेचे असते. त्यामुळे ग्राहकाने जागरूक असणे महत्वाचे ठरते. हॉटेलमध्ये गेल्यावर तिथे कोणत्या ग्लासात पाणी दिले जाते, माशांचे प्रमाण किती आहे, स्वच्छता कशी आहे, वेटर किंवा वाढपी स्वच्छ आहे का, त्याचे हात, कपडे कसे आहेत याकडे ग्राहकांनी आवर्जून लक्ष द्यावे. गरज वाटल्यास त्याची मालकाला कल्पना देऊन बदलाची मागणी करावी आणि तसेही न झाल्यास आम्हाला टोल फ्री क्रमांकावर कळवावे.
प्रश्न : कोणत्याही हॉटेलवर थेट कारवाई केली जाते का किंवा त्याची पद्धत काय आहे ?
उत्तर : दोन प्रकारे कारवाई केली जाते. जर एखादे हॉटेल प्रचंड अस्वच्छ असेल तर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र एखादे हॉटेल काही नियम पाळत नसेल तर त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते. त्यात सांगितल्यानुसार बदल करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला जातो आणि पुन्हा तपासणी केली जाते. त्यातही काही चुका आढळल्यास अजून काही कालावधी दिला जातो आणि पुन्हा तपासणी केली जाते. मात्र तरीही व्यावसायिक योग्य कार्यवाही करत नसेल तर मात्र संबंधित व्यावसायिकाच्या हॉटेलवर कारवाई केली जाते.