ज्याचेे ‘डिपॉझिट’ वाचत नाही, त्याची काय नोंद घ्यायची?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:17+5:302021-02-13T04:12:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही, त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही, त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं आणि तुम्ही? मला प्रेस कॉन्फरन्मध्ये त्याबाबत प्रश्न विचारून का? महत्त्व देता अशा लोकांना,” असे सांगत उपमुख्यमंत्री आणि ‘राष्ट्रवादी’चे नेते अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची खिल्ली उडविली.
भाजप आमदार पडळकर यांनी जेजुरीतील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. नियोजनाप्रमाणे शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. १३) या पुतळ्याचे अनावरण निश्चित करण्यात आले होते. मात्र आदल्या दिवशीच शुक्रवारी पडळकर यांनी पुतळ्याचे अनावरण केले. या वेळी त्यांनी शरद पवार आणि अन्य पवार कुटुंबीयांवर जोरदार टीका केली. त्याबाबत अजित पवार यांना विचारणा केली असता ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “अहो यांची टीका म्हणजे ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आहे. लोकांनी नाकारले त्यांना फार महत्त्व देऊ नका.” विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे बारामतीतील आव्हान मोडीत काढले होते. भाजपने बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना रिंगणात उतरवले होते. या लढतीत पडळकरांसह सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
चौक
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच
“विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. ते त्यांच्याकडेच राहील. त्यात काही बदल करायचा असेल तर त्याचा निर्णय शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे हे आमचे तीन नेते घेतील,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.