काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 02:01 PM2023-09-16T14:01:22+5:302023-09-16T14:02:56+5:30
अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या माध्यमातून पुरवले जात आहे....
तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव दाभाडेमध्ये पांडवकालीन मंदिर आहे, मावळ प्रांताची इतिहासात नोंद आहे. हे आपणास माहीत आहे. पण, आता मावळ तालुक्याच्या शिरपेचात नवीन तुरा रोवला जाणार आहे. अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या माध्यमातून पुरवले जात आहे.
सुंदर डिझाईन केलेले मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बनविले जात आहे. या मटेरियलचे तब्बल ८० ते १०० कंटेनर अयोध्येला जाणार असून, हे मटेरियल वापरून ५ ते ६ किलोमीटर लांबीची पावसाळी पाण्याची वाहिनी टाकण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान बॉर्डरवरही हेच मटेरियल पुरवले जात आहे. त्यामुळे अयोध्येतील राममंदिरासाठी मावळ तालुक्याने खारीचा वाटा उचलला आहे.
आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपचे संस्थापक यशस्वी उद्योजक रामदास काकडे व युवा उद्योजक संदीप वनवारी, रणजीत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कंटेनरचे पूजन नवलाख उंब्रे व जाधववाडी ग्रामस्थ व कामगारांच्या हस्ते करून व मिठाई वाटून कंटेनर अयोध्येकडे रवाना करण्यात आला. यावेळी मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तालुकाध्यक्ष दिनकर शेटे, विकास सोसायटी चेअरमन तानाजी पडवळ, संतोष नरवडे, काळूराम जाधव, बळीराम मराठे, अनिल कोतुळकर, रामदास यादव, रवींद्र गोडबोले यांच्यासह नवलाख उंबरे जाधववाडी ग्रामस्थ, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मावळ तालुक्याची ओळख ‘उद्योगनगरी’ अशी आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राममंदिरासाठी आमच्या आरएमकेमधून स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल पाठविण्यात येणार आहे. ही बाब आमच्या कंपनीच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.
- रामदास काकडे, उद्योजक