नाकावरच्या रागाला औषध काय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:36+5:302021-07-16T04:08:36+5:30

आईबाबांच्या मुलांच्या प्रति काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. त्यातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची यादी करायची म्हटली तर सगळ्यात आधी येते, ते चांगले ...

What a cure for nasal congestion | नाकावरच्या रागाला औषध काय

नाकावरच्या रागाला औषध काय

googlenewsNext

आईबाबांच्या मुलांच्या प्रति काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. त्यातल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांची यादी करायची म्हटली तर सगळ्यात आधी येते, ते चांगले आरोग्य, चांगल्या सुखसोयी, चांगले शिक्षण... पण याच बरोबर पालक म्हणून आपली मुलांच्या प्रति एक फार महत्त्वाची जबाबदारी असते आणि ती म्हणजे मुलांना चांगले वळण लावून त्यांना आयुष्यात एक चांगला माणूस बनवणे. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात आणि त्यांच्या संगोपनात काहीच कमी राहू नये याबद्दल प्रत्येक पालक जागरूक असतो. बऱ्याचदा अशा सवयी लावताना आईवडिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

मोठ्यांप्रमाणे मुलांचेसुद्धा स्वभाव असतात आणि मोठ्यांसारखेच त्यांनासुद्धा भावना असतात.

फुगा दिला की मूल खुश होते तसेच त्यांच्या मनाविरुद्ध काही घडले की त्यांना राग येणारच.

त्यांच्या मनाविरुद्ध कोणती गोष्ट केव्हा घडेल हे आपल्याला आधीच कळणे शक्य नाही.

त्यामुळे मुलांच्या राग येण्यावर आपण नियंत्रण ठेवण्यापेक्षा किंवा त्यांना राग येऊच नये यासाठी आटापिटा करण्यापेक्षा त्यांना राग आल्यावर त्यांनी काय करायचे, त्यांना रागावर मात करायला कशी शिकवायची, याचा जास्त विचार करायला हवा.

आज या लेखातून आम्ही नेमका हाच विषय घेऊन आलोय.

अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही मुलांना लहानपणापासूनच शिकवू शकता जेणेकरून त्यांना स्वतःचा राग जास्त चांगल्या प्रकारे हॅन्डल करता येईल?

मुलांना anger management शिकवण्यासाठी या सोप्या टिप्स..

१. मुलांना एखाद्या गोष्टीचा राग आलेला असताना त्यांना काही सांगायला जाऊ नका.

मुलांना समजवण्याची वेळ ही मुले शांत झाल्यावरची असली पाहिजे.

रागात असताना मुले काहीच ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात.

त्यामुळे तुम्ही शांतपणे, रागावून कसेही सांगितले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नसतो.

कधी त्यांनी ऐकून जरी घेतले तरी असे रागाच्या भरात ऐकलेले त्यांच्या लक्षात राहणे अवघडच आहे.

म्हणून तुमच्या मुलांना राग आलेला असताना त्यांना काही सांगण्या-समजावण्या ऐवजी त्यांना शांत राहूद्या, हवे तर त्यांचे ऐकून घ्या, तात्पुरते त्यांच्या हो ला हो करा.

त्यांचा राग निवळला की मात्र शांतपणे त्यांना समोर बसवून समजवा..

त्यांना राग येण्यासारखीच एखादी गोष्ट घडली असेल तरीही त्यांच्या रागामुळे त्यांनाच त्रास झाला आणि त्यांचेच नुकसान झाले या गोष्टीची त्यांना ते शांत झाल्यावर अवश्य जाणीव करून द्या.

२. मुलांना राग आलेला असताना तुम्ही शांत राहा.

मुलांसाठी आईबाबा ही त्यांची हक्काची, विश्वासाची जागा असतात.

त्यांच्या या अपेक्षा योग्यच आहेत आणि आईबाबा म्हणून आपण त्या अपेक्षांचा आदरच केला पाहिजे.

म्हणूनच जेव्हा तुमच्या मुलांना राग आलेला असतो, भलेही तो चुकीच्या गोष्टीसाठी का असेना त्या वेळेला तुम्ही शांत राहून परिस्थितीचा ताबा घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

राग आल्यावर मुलांची सारासार विचार करायची क्षमता संपलेली असते आणि आपल्याला राग येऊन आपली ही विचारशक्ती संपवण्यापेक्षा ती शाबूत ठेवायचा प्रयत्न करणेच जास्त योग्य नाही का?

३. कोणत्या गोष्टींमुळे मुलांना राग येतो यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे.

मुलांना एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटल्यावर, त्यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यावर, त्यांना एखाद्या कामाची जबरदस्ती केल्यावर?

नक्कीच अशी अनेक कारणे असतील ज्यामुळे मुलांना राग येत असेल.

ही अशी कारणे लक्षात घेऊन मुलांशी याबद्दल संवाद साधला पाहिजे.

त्यांनाही या कारणांची जाणीव करून द्यायला पाहिजे.

मुले योग्य आणि अयोग्य कळायच्या वयाची झाली की आपोआप त्यांना राग येणे बरोबर होते की चूक याची जाणीव होईल.

लहान वयातल्या मुलांना ती जाणीव होईल यासाठी त्यांना समजावून सांगायचे प्रयत्न केले पाहिजेत.

४. त्यांना राग निवळायला मदत करा

बहुतेक मुलांना राग आल्यावर काही काळ एकटे ठेवले तर फायदा होतो, पण सगळीच मुले सारखी नसतात.

काही मुलांना शांत करायला आईवडिलांची मदत लागते.

आपले मूल जर असे सहज शांत होणाऱ्यातले नसेल तर आपण त्यांना शांत व्हायला मदत केली पाहिजे.

त्यांचा राग जाईपर्यंत त्यांच्याबरोबर वेळ घालवून, त्यांच्या आवडीच्या गोष्टी करून किंवा कधी कधी त्यांचे फक्त ऐकून घेण्याचे काम करून त्यांना मदत केली पाहिजे.

५. त्यांच्या भावना ओळखायला त्यांना मदत करा

मुलांना अपेक्षित असलेली एखादी गोष्ट घडली नाही तर त्यांना वाईट वाटते.

या वाईट वाटण्याला ते बऱ्याचदा राग समजतात.

अशा कित्येक गोष्टी असतील ज्यामुळे मुलांना वाईट वाटत असेल किंवा त्यांचे मन दुखावत असेल.

पण याची त्यांना जाणीवच होत नसेल आणि या सगळ्या मानसिक स्थितींना ते रागच समजत असतील.

म्हणूनच मुलांना या सगळ्या इमोशन्सची जाणीव करून दिली पाहिजे.

वेगवेगळ्या गोष्टी सांगून हे करता येऊ शकते. यामुळे त्यांना स्वतःलाच समजायला मदत होईल की आपल्याला नक्की राग आला आहे का वाईट वाटले आहे.

६. राग व्यक्त करण्याची तुमची पद्धत काय याचा विचार करा

मुले तुमचे सतत अनुकरण करत असतात, चांगल्या गोष्टींचे आणि वाईट गोष्टींचेसुद्धा.

म्हणूनच तुम्हाला राग आला तर तुम्ही काय करता?

तुमचा राग व्यक्त करायची पद्धत काय आहे? या गोष्टींचा तुमच्या मुलांच्या राग व्यक्त करण्यावर खूप प्रमाणात परिणाम होत असतो.

म्हणूनच मुलांसमोर राग आला तर तुमची वागणूक आदर्श असली पाहिजे.

आवाजावर, भाषेवर ताबा असायला हवा.

तुमच्याकडे बघूनच तुमच्या मुलांना नकळत, न शिकवता हे धडे मिळत असतात आणि हे चांगले धडे त्यांना मिळावे यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न केले पाहिजेत.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वर म्हटल्याप्रमाणे राग हा सगळ्यांनाच येतो.

आपल्या हातात या रागावर ताबा मिळवणे असते.

राग यायचे प्रमाण नक्कीच कमी केले जाऊ शकते, पण पूर्णपणे बंद नाही. पण या रागाचा आपल्यावर कसा आणि किती परिणाम होऊ द्यायचा हे मात्र आपल्या हातात असते.

मोठेपणी येणाऱ्या ‘स्ट्रेस’च्या असंख्य कारणांपैकी राग कंट्रोल न होणे हे एक अतिशय महत्त्वाचे कारण आहे.

याचसाठी मुलांना राग हा भावनेशी अगदी लहानपणीच ओळख करून दिली पाहिजे.

राग ‘हॅन्डल’ करायचे किंवा ‘मॅनेज’ करायचे ट्रेनिंग त्यांना लहानपणापासूनच दिले तर पुढे जाऊन या गोष्टीचा त्यांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदाच होणार आहे….

मेघा होमकर, पुणे

Web Title: What a cure for nasal congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.