‘महाराष्ट्र को क्या मिला; मुख्यमंत्री साहेब, जरा सिरियस व्हा...! सुप्रिया सुळे यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 06:12 PM2022-09-15T18:12:02+5:302022-09-15T18:13:41+5:30
केवळ हारतुरे स्वीकारणे, खुर्चीत बसले की मुख्यमंत्री होत नाही, त्यासाठी जबाबदारी स्विकारावी लागते.
पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे राज्यातील सुमारे अडीच ते तीन लाख तरुणांच्या रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तळेगाव येथील जागा वेदांता कंपनीने निश्चित केली होती. ती कशामुळे गेली याचे उत्तर राज्यातील सत्ताधाऱ्यांना द्यावे लागेल. केवळ खुर्चीमध्ये बसणे आणि हार-तुरे स्विकारणे म्हणजे सर्व काही मिळविले असे नसते तर त्या पदाची जबाबदारी देखील घ्यावी लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता सिरियस होण्याची गरज आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनावले.
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशी वेदांता-फॉक्सकॉन कंपनी राज्याबाहेर गेल्याचा निषेध बालगंधर्व येथे आंदोलन करून नोंदविण्यात आला. यावेळी ‘महाराष्ट्र को क्या मिला, लॉलीपॉप लॉलीपॉप’ अशा जोरदार घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टिकेची तोफ डागली. त्या म्हणाल्या की, वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्ही तुम्हाला याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ अशा प्रकारचे लॉलीपॉप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार केवळ जनतेस लॉलीपॉप दाखवत असून कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात येत नाही. लहान मुलांना ज्या प्रकारे समजूत काढण्यासाठी आश्वासन दिले जाते तसेच लॉलीपॉप सरकार जनतेस देत आहे. राज्याच्या हितासाठी सरकारने काम करणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारमध्ये गुजरातमधील वजनदार नेते असून आगामी गुजरात विधानसभा निवणुकीपूर्वी मताचा जोगवा पदरात पाडून घेण्यासाठी वेदांता प्रकल्प हलविण्यात आला आहे.