काय करावं यांचं..! पुण्यात वर्षभरामध्ये मोबाईलवर बोलणारे २१ हजार वाहनचालक पोलिसांच्या जाळयात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 01:45 PM2021-01-06T13:45:43+5:302021-01-06T13:46:35+5:30
मुख्यमंत्र्यांचा फोन असतो की पंतप्रधानांचा? कुटुंबीयांचीही नाही पर्वा
पुणे : वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे, असे असले तरी आपल्या जीवापेक्षा अनेकांना मोबाईलचा कॉल घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. अशा २१ हजार ८५१ वाहन चालकांवर गेल्या वर्षभरात पोलिसांनी कारवाई केली आहे. ही केवळ पोलिसांनी केलेली कारवाई आहे. यापेक्षा कित्येकपटीने वाहनचालक बिनधास्तपणे वाहन चालविताना मोबाईलवर सर्रास बोलताना जागोजागी आढळून येत असतात.
वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाईलवर बोलणाऱ्या २१ हजार ८५१ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३ लाख ७० हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मोबाईलवर बोलणाऱ्या वाहनचालकाला २०० रुपये दंड केला जातो. लॉकडाऊनमुळे काही महिने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे चार महिने कारवाई झाली नव्हती. नाही तर याचा आकडा आणखी वाढू शकला असता. विना गिअरच्या दुचाकी वाहनांमुळे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एका हातात मोबाईल धरून किंवा कान आणि खांद्या वाकडा करून त्यात मोबाईल धरून वाहनचालक बोलत जात असल्याचे दिसून येतात. जीवापेक्षा कोणाचाही फोन इतका महत्त्वाचा कधीच नसतो. पण, याची जाणीव बहुतांश वाहनचालकांकडे नसल्याचे दिसून येते.
याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, वाहन चालविताना चालकाचे सर्व लक्ष वाहन चालविण्याकडेच असले पाहिजे. मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याने चालकाचे लक्ष विचलित होऊ शकते. काही क्षण जरी लक्ष विचलित झाले तर अपघाताची शक्यता वाढते. दुचाकीचालक तसेच चारचाकी चालक स्वत: बरोबरच रस्त्यावरील इतर वाहने, पादचारी यांना धोका पोहचवू शकतात. तसेच गाडीत बसलेल्या इतरांच्या जीवाला ते धोका निर्माण करीत असतात. एक सेंकदभराचेही दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर बेतू शकते. पण
.......
विनाहेल्मेट आणि झेब्रा कॉसिंगवर वाहन पुढे करणे, याच्या पाठोपाठ वाहतूक नियमभंगाखाली वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-यावर तिस-या क्रमांकाची कारवाई करण्यात आली आहे.
.......
आपले घरी कोणीतरी वाट पहात आहे. याची जाणीव ठेवून वाहनचालकाने संपूर्ण लक्ष वाहन चालविण्याकडे ठेवावे. मोबाईलवर बोलून तुम्ही तुमच्या व इतरांचा जीव गमावण्याची शक्यता वाढते. अशा दुर्लक्षामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना कायमस्वरूपी दुखापत झालेली आहे. हे पाहता चालकांनी वाहन चालविताना मोबाईलवर न बोलता पोलिसांना सहकार्य केले तर कारवाईची वेळ येणार नाही.
-राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा