आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:39+5:302021-06-30T04:08:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबध? मी सांगितलेली विकासकामे ऐकत नाहीत, आणि अशी कामे लगेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: आंबील ओढा कारवाईशी माझा काय संबध? मी सांगितलेली विकासकामे ऐकत नाहीत, आणि अशी कामे लगेच ऐकतात का? असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील बैठकीत मंगळवारी केला.
पुण्यातील विविध प्रश्नांवर पवार यांनी मुंबईत ही बैठक आयोजित केली होती. महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे वगळता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कोणीही बैठकीला प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन उपस्थित नव्हते.
आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, महापालिकेतील विरोधीपक्ष नेत्या दीपाली धुमाळ हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
कामगार मंत्री हसन मुश्रीफ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, त्यांच्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेही बैठकीला होते.
समाविष्ट गावे, तेथील समस्या, रस्ते विकास, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध प्रलंबित विषयांवर बैठकीत चर्चा झाली. कात्रज तलाव तसेच पुराचे पाणी वस्तीत शिरत आहे, त्याठिकाणी तातडीने संरक्षक भिंती बांधाव्यात असे पवार यांनी सांगितले. समाविष्ट गावांमधील शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व अन्य आस्थापना गावांबरोबरच महापालिकेत वर्ग व्हाव्यात, यापुढील २३ गावांसाठीही हाच निर्णय राहील असे त्यांनी सांगितले.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यातील अडथळे नगर विकास विभागाने दूर करावेत, कर्मचारी आकृतीबंधाला मान्यता द्यावी, असे पवार म्हणाले.
महापालिका आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषप्रसाद हे बैठकीसाठी पुण्यातून ऑनलाईन उपस्थित होते.
बैठकीतील महत्वाचे निर्णय
- रस्ते विकासात बीडीपीचा अडथळा येत असेल तर यावर धोरणात्मक निर्णय घेऊ.
- स्मशानभूमी, दफनभूमीसाठी राखीव जागा त्वरित ताब्यात घ्याव्यात.
- पुरापासून बचावासाठी सर्व ठिकाणी संरक्षक भिंतींचे काम त्वरित सुरू करावे.
- शिवणे ते खराडी हा मार्ग नदीपात्रातून सिंगल पिलरवर करण्याबाबत प्रकल्प आराखडा तयार करावा.
- शिवणे ते नांदेड पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम सुरू करावे.