चिंतामणीने आता करावे तरी काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:10 AM2021-04-17T04:10:13+5:302021-04-17T04:10:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा उचलून नेल्याची तक्रार केली म्हणून फायनान्स कंपन्यांनी आता रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रिक्षा उचलून नेल्याची तक्रार केली म्हणून फायनान्स कंपन्यांनी आता रिक्षाचालकांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. तक्रार मिटली असे लिहून द्यावे म्हणून कंपन्या मागे लागल्या असून पुन्हा रिक्षा उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे.
कसबा पेठेत राहणाऱ्या चिंतामणी यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून रिक्षा घेतली, चांगला व्यवसाय सुरू होता, तर टाळेबंदी लागली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाने हप्ता गेला नाही तरी कंपनी काही महिने थांबली, नंतर मात्र घरी येऊन रिक्षा उचलून नेली. त्याविरोधात चिंतामणी यांनी आरबीआयकडे एका रिक्षा संघटनेच्या माध्यमातून तक्रार केली. आरबीआयने दखल घेत संबंधित कंपनीविरोधात कारवाई सुरू केली.
दरम्यानच्या काळात चिंतामणीच्या दोन्ही मुलींनी त्या काम करत होत्या तिथून तीन महिन्यांचा पगार आगाऊ घेतला व काही हप्ते जमा केले.
कंपनीने रिक्षा सोडली, मात्र चिंतामणी यांच्यावर तक्रार मागे घेण्याबाबत दबाव आणण्यास सुरुवात केली. चिंतामणीचा व्यवसाय सुरू होता, त्यामुळे त्यांनी लक्ष दिले नाही, पण व्यवसाय कमी झाला, त्यामुळे पुन्हा त्यांचे हप्ते थकले व कंपनीने आता त्यांच्यावर रोज दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. हप्ते थकले म्हणून नोटीस पाठवून रिक्षा पुन्हा उचलून नेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.---//
असे एक नाही अनेक चिंतामणी आहेत. आम्ही फायनान्स कंपनीच्या विरोधात रीतसर तक्रार केली. हप्ते थकले म्हणून वाहन उचलून नेण्याआधी कंपनीने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत.
- आप रिक्षा संघटना