काय सांगता? कुत्रे आणि लांडग्यांमध्ये जैविक संकर!
By श्रीकिशन काळे | Published: October 2, 2023 07:57 AM2023-10-02T07:57:29+5:302023-10-02T07:58:17+5:30
लांडग्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
श्रीकिशन काळे
पुणे : वन्यजीवांच्या अधिवासामध्ये मानवी हस्तक्षेप आणि भटके कुत्रे वाढत असल्याने तिथे लांडग्यांच्या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे देशात पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात लांडगा आणि कुत्रा यांच्यात जैविक संकर होऊन तयार झालेला लांडगा पाहायला मिळला आहे. त्यामुळे लांडग्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
‘इकॉलॉजीण्ण्न्ड इव्हॅलुशन जर्नल’मध्ये याविषयीचे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. याचे संशोधन पुण्यातील ‘द ग्रासलॅण्ड ट्रस्ट’ संस्थेतील लांडग्यावर अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी केले आहे. त्यानंतर ग्रासलॅण्ड ट्रस्टने बंगळुरूमधील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स (एनसीबीएस) यांना या लांडग्याचे सॅम्पल पाठवले आणि त्याचा जिनोम सिक्वेन्स तपासला. तेव्हा हे लक्षात आले. ‘एनसीबीएस’च्या शास्त्रज्ञांनी केसांच्या नमुन्यांमधून डीएनए काढला आणि जीनोम सिक्वेन्सिंग केले. त्याची तुलना देशातील लांडगे, स्थानिक लांडगे, कुत्रे, कोल्हे आणि ढोले यांच्यासह पाच भारतीय लांडग्यांच्या आधीच्या अनुक्रमित नमुन्यांशी सिक्वेन्सिंग करण्यात आले. त्यानंतर स्पष्ट झाले की, लांडगा व कुत्रा यांचा संकर झाला.