काय सांगता! हापूस आंबा अन् तेही चक्क EMI वर, पुणे तिथे काय उणे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 09:02 AM2023-04-05T09:02:28+5:302023-04-05T09:02:59+5:30
पुण्यातील एका आंबे विक्रेत्याने भन्नाट आयडियाने सर्वसामान्य नागरिकही हे महागडे आंबे खरेदी करणार
पुणे/किरण शिंदे : उन्हाळा सुरू झाला की आंबा खाण्याची ओढ लहानांपासून मोठ्यांसह सर्वांनाच लागते. मात्र फळांचा राजा असलेल्या आंब्याचे भाव सुरुवातीला सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नसतात. नेमके हेच हेरून पुण्यातील एका आंबे विक्रेत्याने भन्नाट आयडिया केली आहे. या आंबे विक्रेत्याकडे चक्क EMI वर आंब्याची पेटी मिळणार आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकही हे महागडे आंबे खरेदी करू शकणार आहेत.
पुण्यातील गौरव सणस या व्यावसायिकाच्या डोक्यातून ही कल्पना बाहेर पडली. गौरव सणस हे मागील अनेक वर्षापासून पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे नैसर्गिकरीत्या पिकवलेला देवगड हापूस मिळतो. या वर्षापासून त्यांनी दुकानात EMI वर आंबे विकण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कल्पनेला यशही आलं असून आतापर्यंत त्यांच्याकडून दोन ग्राहकांनी ईएमआयवर आंबे विकत घेतले आहेत.
आपल्या या अनोख्या संकल्पनेविषयी बोलताना गौरव सणस यांनी सांगितले की, महागडा आणि न परवडणारा मोबाईल नागरिक ईएमआयवर घेतात तर आंबे का घेऊ शकणार नाहीत अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. त्यानंतर पेटीएमच्या माध्यमातून ही कल्पना प्रत्यक्षात साकारली. इतकच नाही तर हा भारतातील पहिलाच प्रयोग असल्याचंही गौरव सणस यांनी एका माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.