कोरोना विषाणू काय शिकवतो? (मंथन लेख१)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:11 AM2021-04-03T04:11:17+5:302021-04-03T04:11:17+5:30
शरद पांडुरंग काळे sharadkale@gmail.com कोरोना विषाणूंच्या हल्ल्याची दुसरी लाटेने आपल्या महाराष्ट्रात बराच उच्छाद मांडला आहे. अजून तरी भारतातील इतर ...
शरद पांडुरंग काळे
sharadkale@gmail.com
कोरोना विषाणूंच्या हल्ल्याची दुसरी लाटेने आपल्या महाराष्ट्रात बराच उच्छाद मांडला आहे. अजून तरी भारतातील इतर राज्यांमध्ये ही लाट तेवढ्या तीव्रतेने जाणवत नाही. महाराष्ट्रात मात्र पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा परिणाम अधिक गंभीर असेल, असे आता स्पष्टपणे दिसत आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढत आहे हे खरे असले तरी, या लसीमुळे जी प्रतिकारशक्ती यावयास हवी त्यासाठी कमीत कमी दीड महिना तरी लागतो. त्यामुळे या लशीचा प्रत्यक्ष फायदा अजून तरी कुणालाच मिळणार नाही. त्यासाठी थोडी वाट पहावीच लागेल. मास्कशिवाय सध्या तरी या रोगावर मात करण्यासाठी कोणताच प्रभावी उपाय उपलब्ध नाही. त्यामुळे हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे ही त्रिसूत्री प्रत्येकाने पाळलीच पाहिजे.
माझे वडील पांडुरंग लक्ष्मण काळे ह्यांच्या वयाला या मे महिन्यात ९८ वर्षे पूर्ण होतील. त्यांची प्रकृती पहिल्यापासून उत्तम म्हणावी अशी आहे. शिस्तशीर जीवन कसे असते हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले. ठराविक वेळी ठराविक प्रमाणातच जेवण करण्याची त्यांची शिस्त वाखाणण्याजोगीच आहे. आत्तापर्यंतच्या जीवनात डॉक्टरांची फारशी गरज त्यांना वाटली नाही. आम्ही त्यांना आप्पा म्हणतो. आप्पा आजारी आहेत असे कधी फारसे आठवत नाही. आणि आमच्या आप्पांना कोव्हिड १९ ची बाधा झाली.
अहमदनगरजवळील पारनेर या तालुक्याच्या गावी ते १ फेब्रुवारीला आले होते. २२ फेब्रुवारी रोजी एका छोट्या समारंभात त्यांना करोना विषाणूंनी गाठले. प्रकृतीविषयी फारशी तक्रार करण्याचा स्वभाव नसल्यामुळे त्यांनी सुरुवातीचे दुखणे अंगावर काढले. त्यांच्या भोवती असलेल्या लोकांनाही त्यांना कोरोना झाला असेल अशी कल्पना आली नाही. सहा सात दिवसांनी दुखणे विकोपाला गेले. जेवण जवळजवळ बंद झाले होते. श्वासोच्छवास करण्यास त्रास होऊ लागला. ती बातमी कळताच आम्ही त्यांना पुण्याला एका खासगी रुग्णालयात त्यांना तातडीने दाखल केले. न्युमोनियाचे निदान होताच त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. करोना विषाणूंचा प्रादुर्भाव आहे याची निश्चिती झाली आणि त्याप्रमाणे उपाययोजना सुरू झाली. ऐकायला येत नसल्यामुळे डॉक्टर किंवा नर्स काय म्हणतात, तेही त्यांना समजेना! डाव्या कानाने थोडेसे ऐकायला येते, हे वैद्यकीय स्टाफला समजायलाही दोन दिवस लागले. त्यांना जेवण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे लागते. त्यामुळे घरून डबा देण्याची परवानगी मिळाली. तोपर्यंत पोटात काहीच अन्न गेले नाही. दहा दिवस तरी आप्पांचा उपवास घडला होता! नंतरही डबा दिला तरी कुणीच ओळखीचे नसल्यामुळे ते अन्न पोटात जाण्याचे प्रमाण कमीच होते. जरी स्टाफ त्यांच्या परीने प्रयत्न करीत होते, तरी त्यांच्या जेवणाचे हालच झाले. पण शरीराने तरीही साथ दिली, उपचार प्रभावी ठरू लागले, बाह्य ऑक्सिजनची गरज कमी होऊ लागली, त्यांना सामान्य रुग्ण विभागात हलविले. तिथे रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून आम्ही पूर्ण वेळ दोन मदतनीस पुरविले. त्यामुळे त्यांच्या खाण्यात थोडी सुधारणा झाली. डॉक्टरांनी अकराव्या दिवशी बाह्य ऑक्सिजन पूर्ण बंद केला. एक दिवस निरीक्षणाखाली ठेवून त्यांना तेराव्या दिवशी रुग्णालयातून घरी जाण्यासाठी परवानगी दिली. ९८ वर्षांच्या आप्पांनी कोव्हिड १९ वर मात केली होती! करोना विषाणू नामोहरम झाला! त्यांच्या इच्छाशक्तीचा हा प्रचंड विजय होता हे निश्चित! त्यांना घरी येऊन आता आठ दिवस पूर्ण होतील. त्यांच्या वयाच्या हिशेबाने त्यांची रिकव्हरी खरोखरीच खूप छान आहे.
त्यांच्या या झुंजीत तीन गोष्टी अधोरेखित झाल्या.
१. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क हाच उत्तम पर्याय आहे. त्या समारंभात जर मास्क वापरला असता तर त्यांना लागण झाली नसती हे नक्की. जर लोकांनी मास्क वापरण्यात कुचराई केली तर कोरोना विषाणू हा खेड्यातील अगदी स्वच्छ व शुद्ध हवेत देखील स्वतःला प्रस्थापित करू शकतो. म्हणून जिथे दोन किंवा अधिक माणसे एकत्र येणार असतील, त्यांनी मास्क वापरूनच व दोन मीटर अंतर राखूनच परस्पर संवाद साधला पाहिजे. मास्क खाली करून बोलायचे व परत मास्क लावायचे म्हणजे कोरोना विषाणूंना प्रेमाने निमंत्रण दिल्यासारखेच आहे.
२. वेळीच उपचार होणे या कोव्हिड रुग्णांसाठी आवश्यक आहे.जर आप्पांना एक दिवस जरी रुग्णालयात दाखल करण्यास वेळ झाला असता तर शरीरात कोरोना विषाणूंमुळे होणारे सायटोकाईन वादळ सुरू झाले असते. त्यानंतर काय झाले असते हे कुणीच सांगू शकत नाही! महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपचार प्रणाली ही प्रभावी झाली आहे, ह्यात शंका नाही.
३. प्रभावी उपचार प्रणाली, तज्ञ डॉक्टरांचा अनुभव आणि आप्पांची प्रचंड इच्छाशक्ती यामुळे कोरोना विषाणू नामोहरम झाला हे निश्चित म्हणता येईल. कोरोना विषाणू बाधा झाली म्हणजे फाशीची शिक्षा झाली अशी मानसिकता न होऊ देणे हा सर्वात मोठा मंत्र आहे. आप्पा या सर्व प्रकरणात हतबल झाले नव्हते. व्हिडीओ कॉल ध्ये त्यांच्या चेहऱ्यावर सुरुवातीचे दोन दिवस प्रचंड वेदना दिसत होत्या. पण तरी देखील ते "मला घरी घेऊन जा" हे म्हणतच होते. नंतर वेदना कमी झाल्या तशी चेहऱ्यावर थोडी तुकतुकी आली. नंतर तर दिवसातून दोन-तीन कॉल होत होते, व प्रत्येक वेळी त्यांच्या चेहऱ्यावर असलेल्या भावांमुळे आम्हाला धीर येत होता. इच्छाशक्ती किती महत्त्वाची आहे, हेच आप्पांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या उदाहरणावरून कोरोना विषाणूंशी यशस्वी लढा देता येतो, हेही दिलासादायक आहे.
व्हिडीओ कॉल म्हणजेच डिजिटल संपर्कयंत्रणा या उपचारप्रणालीत महत्त्वाचा दुवा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. रुग्णाचा बाह्य जगाशी संपर्क तुटला तर त्याचे मानसिक खच्चीकरण होते व कोरोना विषाणू त्याचे शारीरिक खच्चीकरण करीत असतो. या दोन्हीतून बाहेर पडण्यासाठी मनाचा प्रचंड निग्रह लागतो. आप्पांच्या उदाहरणाने हे अधोरेखित केले आहे.
(लेखक भाभा अणुसंशोधन केंद्राचे पद्मश्रीप्राप्त निवृत्त वैज्ञानिक आहेत)