स्वातंत्र्याचा नेमका अर्थ काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 09:00 AM2018-08-15T09:00:01+5:302018-08-15T09:00:01+5:30
स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध वयाेगटातील, क्षेत्रातील लाेकांना स्वातंत्र्याचा अर्थ काय वाटताे ? हे जाणून घेण्याचा लाेकमतने प्रयत्न केला.
राहुल गायकवाड
पुणे : 15 अाॅगस्ट 1947 साली भारत इंग्रजांच्या अधिपत्यातून स्वतंत्र झाला. यानंतर अनेक संस्कृती, प्रदेश, भाषा, जाती, धर्म असलेल्या या देशाची वाटचाल एका लाेकशाहीवादी देशाकडे सुरु झाली. 1950 पासून भारत हा एका नव्या संविधानावर चालू लागला. या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे देशाला दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबराेबरच अनेक प्रकारची स्वातंत्र्ये भारतीयांना मिळाली. स्वातंत्र्याच्या 71 वर्षांनंतर भारतीयांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ नेमका काय अाहे ? संविधानाने बहाल केलेली स्वातंत्र्ये त्यांना मिळाली अाहेत का ? याचा शाेध घेण्याचा प्रयत्न लाेकमतने केला. यात विविध वयाेगटातील तसेच विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी अापली मते नाेंदवली.
घरातून बाहेर पडताना तु कुठे चालली अाहेस ? असे विचारुन काेणी टाेकले नाही तर मुली स्वतंत्र असल्याचे वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या हेमांगीला वाटते. तर काेणाच्याही दडपनाखाली न येता मनासारखं वागता येणं यात गंधर्व या तरुणाला स्वातंत्र्य वाटतं. वाकडेवाडीतील गॅरेजवाला अापल्या कामातच स्वातंत्र्याचा शाेध घेताे. त्याला त्याच्या मनाप्रमाणे काम करता येतं यातचं त्याला त्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ सापडताे. भांडारकर राेडवरील एका चप्पल दुरुस्त करणाऱ्याला त्याचा व्यवसाय कुठल्याही दडपणाखाली न राहता करता येताे हेच स्वातंत्र्य वाटते. अनेक तरुणांना सिगारेट अाेढणे, गाड्यांवर सुसाट फिरणे यात स्वातंत्र्य वाटते, परंतु याबाबत टुरिस्टची गाडी चालविणाऱ्याचे मत जरा वेगळे अाहे. सिगारेट फुंकण्यापेक्षा चांगलं शिक्षण घेऊन समाजाला पुढे घेऊन जाणे म्हणजे स्वातंत्र्य असल्याचे ताे म्हणताे.
सिक्युरिटी गार्डचं काम करणाऱ्या एका काकांना त्यांच्या मुलांना त्यांना हवं तसं शिक्षण ते देऊ शकले हाच त्यांच्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ अाहे. तर चहाचा व्यवसाय करुन कुटुंबाला हातभार लावण्यात चहावाल्या काकुंना त्यांचे स्वातंत्र्य सापडते. अायटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या तरुणांची स्वातंत्र्याची मतं काहीशी वेगळी अाहेत. जेव्हा मुला-मुलींना समानतेने वागवले जाईल यातच स्वातंत्र्य असल्याचे एका तरुणीला वाटते तर रात्री अपरात्री मुलींना रस्त्यावरुन कुठलिही भीती मनात न बाळगता फिरता येईल तेव्हा खरे स्वातंत्र्य मिळाल्याचे दुसरीला वाटते.