कच्चा आराखडा म्हणजे नेमके काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:15 AM2021-08-28T04:15:52+5:302021-08-28T04:15:52+5:30
पुणे : महापालिकेने आगामी पंचवार्षिक निवडणुकीकरिता प्रभागरचनेची तयारी सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगून, प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार ...
पुणे : महापालिकेने आगामी पंचवार्षिक निवडणुकीकरिता प्रभागरचनेची तयारी सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगून, प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र हा कच्चा आराखडा म्हणजे नेमके काय याचे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने करावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.
याबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर व सुहास कुलकर्णी यांनी निवडणूक आयोगाने कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्याऐवजी प्रारूप प्रभाग तयार करण्याच्या सूचना देणे कायद्यानुसार आवश्यक असल्याचे सांगितले आहे़ तसेच कच्चा आराखडा यावर स्पष्टीकरण देऊन गोंधळ दूर करण्याची मागणी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी अहमदनगर महापालिका आणि महाराष्ट्र शासन हे प्रतिवादी असलेल्या एका याचिकेत प्रभाग रचना आणि आरक्षण एकत्र घोषित केले पाहिजेत, असा निवाडा दिला आहे. तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम पाचमध्ये कच्चा आराखडा तयार करण्याची कोणतीही तरतूद नाही, असे असतानाही निवडणूक आयोगाने हे परिपत्रक पाठवले आहे़ त्यामुळे याचा नेमका अर्थ काय आहे याचा खुलासा आयोगाने करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.