उद्योजक गौतम पाषाणकर यांनी सुसाईड नोट लिहिण्यामागचं नेमकं कारण कोणतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 08:54 PM2020-10-23T20:54:50+5:302020-10-23T20:56:59+5:30
पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक आणि उद्योजक गौतम पाषाणकर हे बुधवारी दुपारी 4 वाजतापासून बेपत्ता आहेत. तसेच पोलिसांना त्यांची सुसाईड नोट सापडल्यामुळे उदयॊग विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
पुणे : उद्योजक गौतम पाषाणकर यांच्या बेपत्ता होण्यामागचं कारण आणखीच गुलदस्त्यात गेलं आहे. कारण ते बेपत्ता तर आहेतच पण त्यांनी लिहिलेल्या आत्महत्येच्या चिठ्ठीतील मजकूराबद्दल त्यांच्या कुटुंबियांना काही कल्पना नसल्याचं त्यांचं म्हणणे आहे.
पुण्यातील प्रसिध्द व्यावसायिक आणि उद्योजक गौतम पाषाणकर हे बुधवारी दुपारी 4 वाजतापासून बेपत्ता आहेत. शिवाजी नगरकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेपत्ता होण्यापूर्वी ते शेवटचे दिसले होते. कुटुंबीय शोध घेण्यात अपयशी ठरल्यानंतर त्यांचा मुलगा कपिल पाषाणकरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिस अजूनही तपास करत आहेत. पण गौतम पाषाणकर यांचा शोध लागलेला नाही.
यात सर्वात महत्त्वाची बाब पुढे आली आहे ती म्हणजे 'आर्थिक नुकसानीत मी माझी सगळी स्थावर मालमत्ता घालवून बसलो.' असं गौतम पाषाणकर यांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या हाती दिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. पण आमच्या प्रतिनिधींनी कपिल पाषाणकर यांच्याशी संपर्क साधला असता 'ते कोणत्या आर्थिक नुकसानाबाबत बोलत आहे याची आम्हा कुटुंबियांना कल्पना नसल्याचे सांगत आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक संबंध असलेले पुण्यातील उद्योजक रणजित शिरोळे यांनी सांगितल्याप्रमाणे, 'बांधकाम व्यवसायात झालेला मोठा आर्थिक तोटा, साईटवर अडकलेली कामं आणि व्यवसायातील काही लोकांमुळे झालेलं नुकसान याचा त्यांनी धसका घेतला असावा, ज्यामुळे त्यांना नैराश्य आलं आणि त्यांनी सुसाईड नोट लिहिली.'
पाषाणकर कुटुंबाशी शिरोळे कुटुंबाचे जुने संबंध आहेत. गौतम पाषाणकर बेपत्ता व सुसाईड नोट प्रकरणावर त्यांनी भाष्य केले. रणजित म्हणाले, १९९०च्या सुमारास गौतम जंगली महाराज रस्त्याला कपिल हॉटेल द्वारे उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. मात्र त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पाषाणकर कुटुंब आर्थिक पातळीवर आधीपासूनच सक्षम आहे. गॅस एजन्सी त्यांच्याकडे आधीपासून होती. शिवाय बांधकाम व्यवसायात गौतम पाषाणकर आले. त्यानंतर त्यांनी गाड्यांची डिलरशीप घेतली. दरम्यानच्या काळात प्रिंटींग व्यवसायाचा मोठा सेटअप, पेप्सी पेयाची डिलरशीप असे व्यवसायही त्यांनी केले. गाड्यांच्या डिलरशीपमध्ये होंडा टू व्हिलर आणि नंतर ऑडीसारख्या कार्सची डिलरशीप व्यवसाय ते करत आहेत. पाषाणकर डिलरशीप व्यवसाय मुलगा कपिल तर बांधकाम व्यवसाय गौतम पाषाणकर सांभाळतात. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्यांना या दोनही व्यवसायात चढ-उताराचा सामना करावा लागला. पण डिलरशीप व्यवसायात मागे आल्यानंतर त्यांनी हार मानली नाही. ते लढाऊ वृत्तीचे होते. यापूर्वीही त्यांनी व्यवसायात आलेले चढ-उतार व्यवस्थित सांभाळले होते. मात्र बांधकाम व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे त्यांना नैराश्य आले. बांधकाम व्यवसायात झालेला मोठा आर्थिक तोटा, साईटवर अडकलेली कामं आणि व्यवसायातील काही लोकांमुळे झालेलं नुकसान याचा त्यांनी धसका घेतला असावा, ज्यामुळे त्यांना नैराश्य आलं आणि त्यांनी सुसाईड नोट लिहिली. त्यांनी त्यांचे नैराश्य कुटुंबापासून खूप हुशारीने लपवले. कुणाकडेही ते व्यक्त झाले नाहीत. ज्यामुळे नैराश्यापुढे ती हतबलता त्यांच्या मनातच राहिली असावी.'