अधिकाऱ्यांच्या बदल्या, कर्मचाऱ्यांचे काय?
By admin | Published: May 6, 2017 02:13 AM2017-05-06T02:13:42+5:302017-05-06T02:13:42+5:30
प्रशासकीय नियमांप्रमाणे दोन वर्षांचा सेवा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणावळा : प्रशासकीय नियमांप्रमाणे दोन वर्षांचा सेवा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पोलीस ठाण्यामधील प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. मात्र, वर्षानुवर्षे मावळात काही पोलीस कर्मचारी हे बस्तान मांडून बसलेले आहेत. त्यांचे काय, असा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.
प्रशासकीय नियमांप्रमाणे अधिकाऱ्यांच्या बदल्या दोन वर्षांनी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या पाच वर्षांनी केल्या जातात. एकाच ठिकाणी अधिकारी व कर्मचारी फार काळ राहिल्यास त्यांचा स्थानिकांशी स्नेह वाढतो व त्यांचा परिणाम कामावर होत असल्याने बदली हा सेवेतील एक अविभाज्य भाग आहे. या नियमांप्रमाणे सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या होतात. मात्र, काही पोलीस कर्मचारी हे वर्षानुवर्षे मावळातच सेवा करत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
मावळ तालुक्यात पूर्वी चार पोलीस ठाणी होती. सध्या सात पोलीस ठाणी व दोन महामार्ग टॅब आहेत. एका ठाण्यातील सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ते तालुक्यातील दुसऱ्या ठाण्यात बदलीचा अर्ज करतात. वरिष्ठांकडे सेटिंग लावून बदली करून आणतात. मावळात कायम राहत असल्याने ते मावळवासीय झाले आहेत. अनेकांनी मावळात स्वत:ची घरे, जागा, जमिनी अशी संपत्ती गोळा केली आहे. वर्षानुवर्षे एकाच तालुक्यात राहिल्याने तालुक्यातील राजकारणी, गुन्हेगार व व्यावसायिक यांच्या सोबत त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झालेले असतात. यामुळे अनेक वेळा एखादी अनुचित घटना घडल्यानंतर ती दाबण्यासाठी या जुन्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जातो.
सर्वसामान्यांप्रमाणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबतही त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने गुन्हेगारी कमी होण्याऐवजी त्यांच्या आशीर्वादाने वाढत चालली आहे. काही मंडळी पोलीस ठाण्यातील केवळ आर्थिक गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र व प्रकरणे सांभाळण्याचे काम पाहतात. यामध्ये कधी स्वत:चे तर कधी वरिष्ठांचे हितसंबंध सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली असते. या मंडळीमुळे ठाण्यात गुन्हेगारांना सौजन्याची वागणूक व सर्वसामान्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक मिळत आहे. मावळातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अशी काही मंडळी स्वत:चे बस्तान मांडून बसलेली आहेत. खरे तर या जुन्या मंडळींच्या संपर्क व अनुभवाचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी गरजेचे असताना त्यांच्याकडे ‘अर्थपूर्ण’ जबाबदारी दिली जाते, ही शोकांतिका आहे. किमान एका पोलीस ठाण्यात पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर किमान त्या अधिकारी वा कर्मचाऱ्याची बदली तालुक्याबाहेर करण्याची तरतूद करण्याची गरज आहे. अन्यथा अशा मंडळींमुळे पोलीस ठाण्यांमध्ये सेटिंगचे प्रकार असेच वाढत जातील.
कामकाज : समन्वयाचा अभाव
नवीन बदलून आलेले प्रभारी अधिकारी व वर्षानुवर्षे बस्तान मांडून
बसलेले पोलीस कर्मचारी यांच्यात बरेच वेळा समन्वयाचा अभाव असल्याने एखादी घटना घडल्यास कर्मचारी अधिकाऱ्यांना साथ देत नाहीत. यामुळे अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडूनही त्यांची उकल होत नाही. अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वयाचा अभाव अनेक ठिकाणी जाणवत असल्याने त्यांच्यातील अंतर्गत गटबाजीचा फटका हा सर्वसामान्यांना
बसत आहे.