दहावीनंतर तंत्रशिक्षण क्षेत्रात काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:00+5:302021-05-20T04:10:00+5:30
पुणे शहरातील चाकण येथे सर्वांत मोठे ऑटोमोबाईल हब आहे. या ऑटोमोबाईल हबमध्ये जगातील सर्व मान्यताप्राप्त ऑटोमोबाईल कारखानदार यांची उत्पादने ...
पुणे शहरातील चाकण येथे सर्वांत मोठे ऑटोमोबाईल हब आहे. या ऑटोमोबाईल हबमध्ये जगातील सर्व मान्यताप्राप्त ऑटोमोबाईल कारखानदार यांची उत्पादने तयार होतात. चाकण येथील ऑटोमोबाईल हबसाठी ऑटोमोबाईल पदविका विद्यार्थ्यांची खूप मागणी आहे. या मागणीस अनुसरून चाकण परिसरात असलेल्या पदविका संस्थांना ऑटोमोबाईल पदविका अभ्यासक्रमास महाराष्ट्र शासनाने प्रोत्साहन दिले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमाच्या जागा भरण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून काही ठोस पावले उचलली आहेत. त्यामुळे जनसामान्यांना तसेच ग्रामीण भागातील ताळागाळातील विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाचे महत्त्व व त्यानंतर मिळणाऱ्या रोजगाराच्या संधीचे आकलन चांगल्या प्रकारे झाले आहे. तंत्रशिक्षण विभागातर्फे स्कूल कंनेक्ट हा उपक्रम ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आला. स्कूल कनेक्ट उपक्रमांमध्ये पदविका संस्थेतील अध्यापकांनी तालुकानिहाय गावांची निवड करून त्या गावातील शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या भागातील पदविका अभ्यासक्रम संस्थाची व तसेच इतर जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाची माहिती विस्तृत स्वरूपात दिली आहे. तसेच पदविका अभ्यासक्रमामधील वेगवेगळे अभ्यासक्रम व त्या अभ्यासक्रमांमध्ये पदविका प्राप्त केल्यानंतर त्यांच्या भागात व इतर जिल्ह्यांमध्ये रोजगारची संधी कुठे प्राप्त होतात. या संधीमुळे त्यांच्या जीवनामध्ये होणारे अमूल्य बदल याची माहितीही विद्यार्थ्यांना दिली आहे.
स्कूल कनेक्ट उपक्रमाद्वारे ग्रामीण, शहरी भागातील शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या पुणे विभागातील जवळपास १ लाख विद्यार्थ्यांचा डेटा या पदविका शाखेतील अध्यापकांनी जमा केला. या डेटामध्ये विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर याचे संकलन करून विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतर या संकलित डेटामधून विद्यार्थ्यांना पदविका प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याच्या तारखा व तसेच त्यासाठी माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात आली. त्याचबरोबर निरनिराळ्या व्हाॅट्सअप ग्रुपद्वारे पालकांचे व विद्यार्थ्यांचे पदविका प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे व प्रत्येक टप्प्यांमध्ये प्रवेश अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती यासाठी वेळोवेळी ऑनलाईन कार्यशाळाचे आयोजन केले. कोरोनामुळे, पालकास व विद्यार्थ्यास महाविद्यालयांमध्ये येणे शक्य नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यास ऑनलाइन फॉर्म (E-scrunity) मोबाईलने कसे भरायचे याबाबत मार्गदर्शन केले. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल व तसेच इंटरनेटची सुविधा नाही अशा विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्यास नि:शुल्क मदत केंद्र सुरू केली. या केंद्रावर शासनाने कोरोना महामारीसाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे याचे पुरेपूर पालन करण्यात आले. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पदविका अभ्यासक्रमाला मागील वर्षापेक्षा वीस टक्क्यांनी प्रवेश वाढ झाली.
दहावीच्या निकालाबाबत अंतिम निर्णय झाला नसला तरीही विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षण विभागाच्या विविध प्रवेशासाठी तयार राहणे गरजेचे आहे. राज्यात शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यास आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पदविका अभ्यासक्रमास प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधी जातीचे प्रमाणपत्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गासाठी प्रमाणपत्र, दिव्यांगांबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, सैन्य दलातील प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, अल्पसंख्याक प्रवर्गासाठीचे प्रमाणपत्र, आधिवास प्रमाणपत्र, आधार क्रमांक व संलग्न बँकेचे खाते, उत्पादनाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे व त्यातील त्रुटीची पडताळणी करून प्रवेश प्रक्रियासाठी तयार राहणे विद्यार्थी हिताचे आहे.
- डॉ. दिलीप नंदनवार, शासकीय तंत्रनिकेतन, अवसरी खु.