सुनील कांबळेंना उमेदवारी कशाच्या बळावर दिली ? भाजप पक्षश्रेष्ठींना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:24 PM2019-10-03T14:24:11+5:302019-10-03T14:24:33+5:30
एकाच घरात कितीदा देणार उमेदवारी?
पुणे : राजकारणातील घराणेशाहीला विरोध करीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याची भाषा करणाऱ्या भाजपने पुण्यातील कॅन्टोंमेंट मतदारसंघात माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी उफाळली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी कांबळे यांना कशाच्या जोरावर उमेदवारी दिली, एकाच घरात कितीदा उमेदवारी देणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
दोन वेळा आमदारकी, एकदा मंत्रिपद तसेच नगरसेवकपद अशा प्रकारे पक्षाने सहकार्य केले असताना आता पुन्हा कांबळेंनाच कशाकरिता उमेदवारी, याचे उत्तर कार्यकर्त्यांना हवे आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून २२ जणांनी इच्छुक म्हणून भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे अर्ज केले होते. त्यातील अनेकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्यक्षात मुलाखती घेणे हा केवळ दिखावाच असल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्याने त्या २२ इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परखड शब्दांत पक्षश्रेष्ठींना सुनावले आहे. दिलीप कांबळे हे लोहियानगर या भागात राहतात. त्यांनी मागील वेळेस कॅन्टोंमेंट भागातून फॉर्म भरला. तेव्हादेखील मूळ कॅन्टोन्मेंटमधील कार्यकर्ता दुखावला गेला होता. यंदादेखील मार्केट यार्ड भागात राहणारे सुनील कांबळे कॅन्टोंमेंटमधून निवडणूक लढवत आहेत. अशा वेळी मूळच्या उमेदवारांना डावलून बाहेरील उमेदवारांना तिकीट देण्याचा अट्टहास केला जात आहे? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
उमेदवारी मिळावी याकरिता पक्षाचे राष्ट्रीय संघटक विजय पुराणिक व खासदार गिरीश बापट यांना परिस्थितीची कल्पना दिल्यानंतर देखील त्यांनी काहीच उत्तर दिले
नाही. शेवटी एकाच कुटुंबातल्या किती जणांना तिकीट देणार? यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीला कांबळे कसे सामोरे जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
................
दिलीप कांबळे यांच्या उमेदवारीविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यात आली. त्यांना तिकीट मिळाले नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. पक्षाने आम्हाला विचारात घेतले नाही याचे वाईट वाटते. एकाच घरात दोन वेळा आमदारकी, एकदा मंत्रिपद दिले असताना या वेळी पुन्हा त्यांच्या भावाला तिकीट देण्यात आले. आम्ही कार्यकर्त्यांनी काय शेवटपर्यंत गर्दीच करायची का, सतरंज्याच्याच उचलायच्या का, चार वेळा नगरसेवक पदाकरिता उभा राहिलो त्यापैकी दोनदा निवडून आलो. पक्षाला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते आता बंडखोरीच्या तयारीत आहोत. - बापू कांबळे, माजी नगरसेवक
......................
गेल्या तीस वर्षांपासून भाजप पक्षाचे काम करीत आहे. २० वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. अशा वेळी आम्हाला डावलून सुनील कांबळे यांना नेमक्या कशाच्या जोरावर तिक ीट मिळाले हे पक्षश्रेष्ठींनी सांगावे. यात सुनील कांबळे यांची मुलाखत न घेतादेखील त्यांना उमेदवारी देण्यात आली, याचे कारण काय? २००९ ते २०१९ पर्यंत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. मात्र नेहमीच डावलण्यात आलो. कांबळे यांचा कॅन्टोंमेंट मतदारसंघाशी काय संबंध? गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाºयांना जर पक्ष तिकीट देणार असेल तर आता अशा उमेदवारांचा प्रचार करायचा का? असा प्रश्न पडला आहे. शेवटी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेणार आहे. - डॉ. भरत वैरागे, अध्यक्ष, भाजप अनुसूचित जाती-मोर्चा, माजी नगरसेवक