चहापाण्यासाठी काय तरी द्या !
By admin | Published: May 9, 2015 03:19 AM2015-05-09T03:19:24+5:302015-05-09T03:19:24+5:30
पोटगीची पावणेदोन लाख रुपये रक्कम थकविणाऱ्या पतीविरुद्ध काढलेले अटक वॉरंट बजावण्यासाठी ‘चहापाण्यासाठी काही तरी द्या’ असे म्हणणाऱ्या पोलिसाविरुद्ध न्यायालयाने
हिनाकौसर खान-पिंजार, पुणे
पोटगीची पावणेदोन लाख रुपये रक्कम थकविणाऱ्या पतीविरुद्ध काढलेले अटक वॉरंट बजावण्यासाठी ‘चहापाण्यासाठी काही तरी द्या’ असे म्हणणाऱ्या पोलिसाविरुद्ध न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच संबंधित पोलिसाविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याबाबतही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिरुद्ध पाठक यांनी हा आदेश दिला.
मुळशी तालुक्यातील दुर्गेवाडी येथे राहणाऱ्या तिशीतील ज्योती निंबळे हिने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार केली होती. या प्रकरणी दरमहा ७ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश न्यायालयाने जानेवारी २०१४ ला दिला होता. मात्र, अद्याप तिला पोटगीचा एकही रुपया मिळाला नाही. रक्कम थकल्याने तब्बल पावणेदोन लाख रुपये ज्योतीच्या पतीकडे अडकून पडले आहेत.
२७ एप्रिलला ज्योतीची बहीण मंदा दुर्गे ही लोणावळा पोलिसांकडे पोटगी वसुलीच्या खटल्यातील पकड वॉरँट घेऊन गेली. तेव्हा तेथील पोलिसाला वॉरंट दिल्यावर, त्याने ‘वॉरंटबरोबर चहापाण्यासाठी काही नाही का’ अशी विचारणा केली.
तसेच, वॉरंटच्या झेरॉक्सवर पोचपावती देण्यास नकार दिला. याबाबत मंदा दुर्गे यांनी अॅड.
सुप्रिया कोठारी यांच्यामार्फत न्यायालयात ही बाब निदर्शनास आणून दिली. न्यायालयाने पतीविरुद्ध ३ ते ४ वेळा जप्ती वॉरंट, पकड वॉरंट काढले. त्यात एकही अहवाल पोलिसांनी सादर केला नसल्याचे दाखवून दिले.
मागील २५ महिन्यांपासून ती पोटगीच्या प्रतीक्षेत असल्याचेही न्यायालयाने विचारात घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षकांकडेही करण्याची सूचना केली आहे. (वार्ताहर)