पदवीधर निवडणुक म्हणजे काय असतं रे भाऊ ? पुण्यातील बहुतांश नागरिक व तरुणाई अनभिज्ञ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 05:23 PM2020-11-26T17:23:17+5:302020-11-26T17:26:56+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे प्रचारात रंगत आली आहे...
तेजस टवलारकर-
पिंपरी : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाला अवघे काही दिवस राहिल्यामुळे प्रचारात रंगत आली आहे. सर्व उमेदवारांचा प्रचार जोरदार सुरू असला तरी, शहरातील बहुतांश नागरिक, तरुण निवडणुकीविषयी अनभिज्ञ असल्याची स्थिती आहे. पदवीधर निवडणुकीसंदर्भात शहरातील चहा दुकान, महापालिकेचा परिसर, पीएमपी बस, त्याचबरोबर काही तरुणांशी संपर्क केला असता, अनेकांना पदवीधर निवडणुकीची माहिती नसल्याचे दिसून आले.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक म्हणजे काय ? या निवडणुकीत मतदान ईव्हीएमच्या माध्यमातून होते की मतपत्रिकेव्दारे होते ? निवडून आलेला उमेदवार नेमके काय काम करतो? मतदान कसे करायचे ? पदवीधर मतदारसंघात मतदान करण्यासाठी वयाची अट असते का ? यात फक्त तरुण मतदान करू शकतात का? या प्रश्नांवरून नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले.
अनेकांनी ही निवडणूक ईव्हीएमच्या माध्यमातून होते असेच सांगितले. यंदा कोरोनामुळे ईव्हीएम वगळून मतपत्रिकेचा वापर करून निवडणूक होत असल्याचे काही लोकांनी सांगितले. काही नागरिकांनी सांगितले की या निवडणुकीत मतदान करण्यासाठी वयाची अट असते. त्याचबरोबर कुठे मतदान करायचे, सार्वत्रिक निवडणुकीसारखे सगळेच या निवडणुकीत मतदान करू शकतात का ? याबात माहिती नसल्याचे दिसून आले. पदवीधर निवडणुकीबरोबर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यामुळे अनेकांना या निवडणुकीत फक्त शिक्षकच मतदान करू शकतात, असे काहींनी सांगितले. निवडून आलेला उमेदवार हा नेमके काय काम करतो हे देखील अनेकांना माहिती नाही. या निवडणुकीत कोणते उमेदवार उभे आहेत याविषयी विचारले असता नागरिकांना पक्षांची नावे माहिती आहेत. परंतु सध्याच्या उमेदवारांविषयी फारशी माहिती नसल्याचे दिसून आले. विधान परिषदेची रचना करताना विविध वर्गातले लोक वरिष्ठ सभागृहात येतील, असा विचार करण्यात आला. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निर्माण झाला. पदवीधर मतदारसंघ म्हणजे समाजातल्या पदवीधर लोकांनी निवडून दिलेला पदवीधर आमदार.
---
अशी होते मतमोजणी
संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात. निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळविणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो.
---
मत असे नोंदवावे
मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणत्याही पेनचा वापर करू नये.
तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील पसंतीक्रमांक नोंदवाव, रकान्यात १ हा अंक लिहून मत नोंदवावे.
उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत. तितके पसंतीक्रमांक नोंदवू शकतात. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकच पसंती क्रमांकाचा अंक नोंदवावा. तो पसंती क्रमांक क्रमांक इतर कोणत्यही उमेदवारासमोर नोंदवू नये.
पसंतीक्रमांक हे केवळ १,२,३, अशा अंकामध्ये नोंदवाव. एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांत नोंदवू नये.मतपत्रिका वैध ठरावी याकरिता पहिल्या पसंतीचे मत नोंदवणे आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रमांक नोंदविणे ऐच्छीक आहे. अनिवार्य नाही.