मागच्या वर्षी जे झालं, तसं व्हायला नकाे हाेतं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 08:21 PM2019-01-01T20:21:54+5:302019-01-01T20:23:35+5:30
लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे.
पुणे : लाेक शांततेत अभिवादन करायला येतात त्यांना येऊ द्या, मागच्या वर्षी जे झालं तसं व्हायला नकाे. या वर्षी बघा कसं सगळं शांततेत चालू आहे. तसंच चालायला पाहिजे. काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हिंगाेलीच्या वस्मत तालुक्यातून 78 वर्ष वयाचे पिराजी खंदारे आले हाेते. यंदा पहिल्यांदाच आलाेय, परंतु मागच्या वर्षी जी दंगल झाली ती व्हायला नकाे हाेती अशी खंत खंदारे यांनी व्यक्त केली.
काेरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून लाखाे भीम अनुयायी आले हाेते. पहाटेपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या हाेत्या. लहान थाेरांपासून सर्वजन अभिवादन करण्यासाठी आले हाेते. हिंगाेलीतून आपल्या पत्नी आणि नातवंडासाेबत 78 वर्ष वयाचे पिराजी खंदारे सुद्धा आले हाेते. मागच्या वर्षी झालेल्या दंगलीची आठवण निघताच असे व्हायला नकाे हाेते असे ते म्हणतात. लाेक शांततेत येतात अभिवादन करतात त्यांना अभिवादन करु द्यावं. असं त्यांना वाटतं.
खंदारे म्हणाले, अनेक वर्षांपासून भीमा काेरेगाव बद्दल ऐकलं हाेतं, आज इथे येण्याचा याेग आला. आम्ही इथं फक्त बाबासाहेब आंबेडकरांसाठी आलाे आहाेत. आम्ही शेतमजुरी करताे. गावतली लाेकं म्हणाली काेरेगाव भीमाला जायला पाहिजे, म्हणून आम्ही सर्वजण आलाे. आता आधीसारखे जातीचे चटके लागत नाहीत. पण जातीयता अजून संपली नाही, ती संपत आलीये. इथं आल्यानंतर ती लवकरच संपेल असं वाटतं.