पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील 'त्या' अपघाताआधी काय काय घडलं? CCTV कॅमेऱ्यात सगळं कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 08:05 PM2024-05-20T20:05:32+5:302024-05-20T20:07:28+5:30
बिल्डरच्या या पोराचे प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत...
- किरण शिंदे
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अगरवाल यांच्यावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारण काय तर त्यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला परवाना नसतानाही आलिशान पोर्शे कार चालवायला दिली. या अल्पवयीन मुलाने ही कार दारूच्या नशेत चालवून दोघांचा जीव घेतला आहे. या अपघाताप्रकरणी बिल्डरच्या या पोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला कोर्टातही हजर करण्यात आले. मात्र कोर्टाने अवघ्या काही तासांत त्याची जामिनावर सुटका केली. मात्र याआधी नेमकं काय काय घडलं? बिल्डरच्या या पोराचे प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत.
तर नुकताच बारावी पास झालेला बिल्डरचा हा अल्पवयीन पोरगा दहा ते बारा मित्रांसोबत पार्टीसाठी आला होता. मुढव्यातील कोझी हॉटेलमध्ये त्यांनी 15 क्रमांकाचा टेबल बुक केला होता. शनिवारी रात्री साडेनऊ ते १२ या वेळेत ते या हॉटेलमध्ये थांबले होते. या हॉटेलमध्ये त्यांनी जेवणासोबत काही मद्य देखील ऑर्डर केले होते. जेवण आणि मध्ये पिऊन झाल्यानंतर हे सर्व मित्र पुढील पार्टीसाठी मुंढव्यातील हॉटेल ब्लॅक या ठिकाणी गेले होते. रात्री बारा ते एक या कालावधीत हे सर्व हॉटेल ब्लॅक या ठिकाणी होते. तेथेही त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर मात्र बिल्डरचा हा पोरगा दोन मित्रांसह आलिशान पोर्शे कार घेऊन निघाला. दारूच्या नशेत बेधुंद झालेल्या या तरुणाच्या हातात होती आलिशान अशी पोर्शे कार. सुसाट वेगाने ही कार घेऊन तो कोरेगाव पार्कच्या रस्त्याने निघाला होता. मात्र दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाला गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणे जमले नाही आणि पुढे होत्याचे नव्हते झाले.
भरधाव वेगातील आलिशान पोर्शे कार अनिश अवधीया या तरुणाच्या दुचाकीला जाऊन धडकली. दुचाकीवर पाठीमागे बसलेली अश्विनी कोष्टा हवेत उडाली आणि जमिनीवर आदळली. तर अनिश पुढे जाऊन एका चारचाकी कारवर आदळला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही यात मृत्यू झाला. मात्र गंभीर घटनेनंतरही आरोपीला काही तासातच जामीन मिळाल्याने संताप व्यक्त केला जाऊ लागला. यानंतर मात्र पुणे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला मद्य विकणाऱ्या हॉटेल चालक आणि अल्पवयीन असतानाही चारचाकी चालविण्यास देणाऱ्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील 'त्या' अपघाताआधी काय घडलं? CCTV कॅमेऱ्यात सगळं कैद#kalyaninagar#accidentpic.twitter.com/tl5YfG7DJt
— Lokmat (@lokmat) May 20, 2024
संपूर्ण घटनेचे पडसाद आज दिवसभर पुणे शहरात राहिले. वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स आणि पब यांच्या तक्रारी देखील पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या. पुणेकर नागरिकांचा वाढता संताप पाहता पोलीस आयुक्तांनीही यापुढे आणखी कठोरपणे कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असा विश्वासही पुणेकरांना दिला आहे.