नेमकं काय घडलं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये : वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:36 PM2019-01-21T18:36:19+5:302019-01-21T18:43:26+5:30

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट असो किंवा सत्यनारायणपूजा प्रकरण, कॉलेज चर्चेत आहेच.

What happened in Fergusson College of Pune: Read detailed | नेमकं काय घडलं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये : वाचा सविस्तर 

नेमकं काय घडलं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये : वाचा सविस्तर 

googlenewsNext

पुणे : शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुण्यात फर्ग्युसन कॉलेज नुसतं जुनंच नाही तर प्रसिद्धही आहे. अजूनही  तिथे हुशार मुलांनाच ऍडमिशन मिळते असं सांगितलं जात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे कॉलेज गुणवत्तेसाठी नाही तर वादांमुळे चर्चेत येत आहे. 
                 राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट असो किंवा सत्यनारायणपूजा प्रकरण, कॉलेज चर्चेत आहेच. त्याचाच पुढचा अध्याय आज लिहिला गेला. आज घडलेली घटना अचानक घडलेली नसून राजकीय अजेंडे राबवण्यासाठी विद्यार्थी कसे वापरले जातात याचं दुर्दैवी उदाहरण आहे. आज काय झाले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला काही दिवस मागे जावे लागेल. विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन न्यायमूर्ती बी  जी कोळसे पाटील यांचे भारतीय राज्यघटनेवर व्याख्यान ठेवले. मात्र त्यानंतर डेक्कन एजुकेशन सोसायटीने संबंधित कार्यक्रम अँफी थिएटरमध्ये घेण्यास परवानगी नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम महाविद्यालयातच करण्याचा निश्चय केला.  


                  दुसरीकडे संस्थेचे शरद कुंटे यांनी ,'आमचा कार्यक्रमाला किंवा वक्त्याला विरोध नाही. मात्र अँफी थिएटरमध्ये काही कायदेशीर कारणामुळे कार्यक्रम करू शकत नसल्याचे सांगितले. आम्ही विद्यार्थ्यांना इतरत्र कार्यक्रम करण्याचे सुचवले होते आणि असे झाले असते तर मी स्वतः त्याचा अध्यक्ष असतो' असे सांगितले. विद्यार्थ्यांनी मात्र एकदा दिलेली परवानगी रद्द करण्याची इतकी काय गरज भासली यावर ठाम होते. हे सर्व घडत असताना विद्यार्थ्यांचा एक गट कोळसे पाटील यांच्या व्याख्यानाला विरोध करत होता. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी कॉलेज प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. दोनही बाजूला घोषणाबाजी सुरु असतानाचं कोळसे पाटील यांनी महाविद्यालयात प्रवेश केला. पोलीस, विद्यार्थी आणि बाउन्सरच्या गराड्यात त्यांनी भाषण केले तेही ऑफिससमोरच्या आवारात ! एकीकडे त्यांचे भाषण सुरु होते दुसरीकडे घोषणाबाजी. अखेर भाषण संपले, वक्ते गेले आणि वातावरण काहीसे निवळले. 
               हा सगळा प्रकार बघणारे इतर विद्यार्थी मात्र जीव मुठीत घेऊन काय झालं विचारत ये- जा करत होते. घटना तास- दीड तासात घडते पण दीडशे वर्षांचे नाव काही तासात कुप्रसिद्ध होते. या प्रकारात चूक कोणाची ? विद्यार्थ्यांनी समजून घेतले नाही की संस्थेने हटवादीपणा केला या सगळ्या प्रश्नाची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत.  पण काहीही संबंध नसताना तिथे आलेल्या एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाच्या हजेरीमुळे हा प्रश्न दिसतो तितका सोपा नाही हे मात्र नक्की !

Web Title: What happened in Fergusson College of Pune: Read detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.