जे लिहितो ते ‘स्वान्त सुखाय:’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:56 AM2018-12-20T02:56:44+5:302018-12-20T02:56:59+5:30
गजानन भास्कर मेहेंदळे : लेखकांवर टाकणारी बंधने मानत नाही
नम्रता फडणीस
पुणे : ‘‘मी माझ्या आवडीकरिता लिहितो. त्यामुळे हे कोण प्रकाशित करणार आहे त्याचा ‘व्यापारी’ बघत नाही. मला जसे पाहिजे तसे मला लिहिता येते. पूर्वी हे सगळ्यांना शक्य होत असे नाही. पुस्तके दोनशे किंवा तीनशेच पानांत बसवा, अशी बंधने लेखकांवर घातली जातात; मात्र मी त्याचा विचार करीत नाही. जितके पाहिजे तेवढे लिहितो. मी जे काही थोडंफार लिहितो ते ‘स्वान्त सुखाय:’..’’ हे बोल आहेत ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे.
भारतीय इतिहास संशोधन क्षेत्रात एक उत्तम संशोधक, अभ्यासक आणि इतिहासकार म्हणून गजानन मेहेंदळे यांचे नाव सुपरिचित आहे. संपूर्ण शिवचरित्राची त्यांनी द्विखंडात्मक मांडणी करून संपूर्ण शिवकाळ वाचकांसमोर उलगडला आहे. त्यांचा ‘शिवाजी हिज लाइफ अँड टाइम्स’ हा चरित्रग्रंथदेखील इंग्रजीमध्येही प्रकाशित झाला आहे. आता दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासलेखनाचे काम मेहेंदळे यांनी हाती घेतले आहे. आत्तापर्यंत दुसºया महायुद्धावरच्या तीन खंडांचे काम झाले आहे; मात्र ते अजून प्रकाशित झालेले नाही. वाढदिवसानिमित्त ‘लोकमत’ प्रतिनिधीने साधलेल्या संवादात त्यांनी दुसºया महायुद्धाच्या इतिहास लेखनाची मांडणी केली.
इतिहासावर लेखन करताना मोडी, फारसी भाषा अवगत असावी लागते. त्या भाषा शिकाव्या लागतात. गेल्या काही वर्षांमध्ये इतिहासाविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. काही तरुण मंडळी इतिहासात औपचारिक शिक्षण घेतलेले नसूनही त्यात रस दाखवू लागली आहेत. मोडी शिकणाºयांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे इतिहास संशोधनाला काहीशी दिशा नक्कीच मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही, असा विश्वास गजानन मेहेंदळे यांनी व्यक्त केला. काही इतिहासकार आहेत जे आपल्या दृष्टिकोनातून जसा इतिहास सांगायला हवा तसा सांगतात. ते सत्यतेची शहानिशा करण्याची फारशी पर्वा करीत नाही. त्यांना जे लिहायचे आहे तेच लिहितात; मात्र इतिहासाची पुनर्मांडणी किंवा पुनर्लेखन करण्यापेक्षा जे घडले आहे तेच मांडले गेले पाहिजे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
जपानी सरकारची बाजू समजत नाही...
‘‘मी सगळ्या बाजूने कॅमेरे लावून काम करीत आहे. ब्रिटिश, अमेरिकन सरकार, काही भारत या सर्व देशांवर झालेले सामाजिक, आर्थिक, राजकीय परिणाम अशा सर्वांगीण परिप्रेक्ष्यातून मांडणी करणार आहे. जपान सरकारचे अधिकृत असे दुसºया महायुद्धावरचे १00 खंड आहेत; मात्र त्याचे भाषांतर झालेले नाही. फक्त एका खंडाचा अनुवाद झाला आहे. त्यामुळे जपानी सरकारची बाजू समजत नाही. ही जी त्रुटी राहणार आहे ती दूर करू शकणार नाही, असे मेहेंदळे म्हणाले.
‘‘सामान्य वाचकांना ‘लष्करी सेवे’ची माहिती नसते. परदेशामध्ये लष्कराची रचना, शस्त्रास्त्र यावर इंग्रजीमध्ये पुस्तके उपलब्ध असल्याने याविषयी सर्वांना ज्ञान अवगत आहे. मराठीत या विषयावर पुस्तके नाहीत. त्यामुळेच लष्कर असते कसे? ते चालते कसे? याची माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता विविध देशांच्या सरकारने प्रसिद्ध केलेली पुस्तके आणि काही लेखकांनी वैयक्तिक लेखन केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेतला आहे.’’
‘‘दुसºया महायुद्धावरच्या पहिल्या खंडात हिटलरचे संपूर्ण चरित्र. तो सत्तेवर कसा आला? चर्चिल आणि स्टॅलिन यांची चरित्रे यांचा समावेश आहे. हिटलरने पोलंड आणि नॉर्वेचा पराभव केला, तो कसा केला याची माहिती दुसºया, आणि फ्रान्सचा पराभव तिसºया खंडात मांडला आहे. जर्मनी आणि ब्रिटन यांच्यात एअरवॉर झाले. मग रशिया, अमेरिका युद्धात उतरली याची मांडणी केली जाईल.’’
‘‘लोकांना आवडेल अशा अलंकारिक भाषेत लेखन करण्याची माझ्यात क्षमता नाही. जे आपल्याला जमते तेच करावे या मताचा मी आहे. मी लोकांना वस्तुनिष्ठ माहिती देऊ शकतो. दुसºया महायुद्धावर लोकांना वाचण्यात अधिक रस आहे. त्यामुळे वास्तववादी माहिती देण्यावरच माझा अधिक भर असतो,’’ अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.
४दुसरे महायुद्ध लिहिण्यापूर्वी पहिले महायुद्ध कळले पाहिजे, याकरिता पहिल्या महायुद्धाचा इतिहास लिहिला आहे. तो १000 पानांचा खंड पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. पहिले महायुद्ध, कोड सायफर्सचा एक आणि दुसºया महायुद्धाचे दहा खंड केले जाणार आहेत.’’
‘लष्कर इतिहास’ या विषयामधून पदवी संपादन केलेल्या मेहेंदळे यांचा दुसºया महायुद्धावरचा लेखनप्रवास सुरू झाला आहे. त्याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘‘आज मराठीमध्ये दुसºया महायुद्धावर फारसे लेखन झालेले नाही. कारण त्या काळी फारशी पुस्तके उपलब्ध नव्हती. आज इंटरनेटमुळे अफाट माहिती उपलब्ध आहे.
अमेरिका, इंग्लंडचे शंभर खंड, भारत-पाकिस्तान असे मिळून २५ खंड आहेत. अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन सरकारची पुस्तके आहेत; मात्र त्या पुस्तकांचे वैशिष्ट्य म्हणजे, ती त्यांच्या बाजूने कॅमेरे लावून लिहिली आहेत. अमेरिकन इतिहास वाचला तर रशियन आघाडीवर युद्ध चालले आहे याची कल्पना येणार नाही.
रशियाचा उल्लेख नसतो. समोर केवळ जर्मन लोक येतात, म्हणून फक्त त्यांची माहिती असते. त्या काळात ब्रिटिश, रशिया काय करत होते ते समोर येत नाही. दुसºया महायुद्धावर चर्चिलचे सहा खंड आहेत; मात्र ते वाचले तर ब्रिटिशांखेरीज दुसरे कुणी युद्धात आहेत ते कळणारच नाही. कारण, त्यातील बहुतांश लेखन स्वत्वावरच झाले आहे.