जे येरवड्यात जमत नाही ते ससूनमध्ये सहज शक्य, ड्रग्ज माफियांना कोण देतंय पाहुणचार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 02:43 PM2023-10-03T14:43:35+5:302023-10-03T14:46:06+5:30

ड्रग्ज माफियांचा अनेक महिने ससूनमध्ये मुक्काम...

What is not possible in Yerwada is easily possible in Sassoon, who is giving hospitality to drug mafia? | जे येरवड्यात जमत नाही ते ससूनमध्ये सहज शक्य, ड्रग्ज माफियांना कोण देतंय पाहुणचार?

जे येरवड्यात जमत नाही ते ससूनमध्ये सहज शक्य, ड्रग्ज माफियांना कोण देतंय पाहुणचार?

googlenewsNext

पुणे : येरवडा कारागृहात जे करता येत नाही ते ससूनमध्ये उपचारांच्या आडून साध्य करता येते. यामुळे अट्टल गुन्हेगार ससूनमध्ये उपचाराच्या निमित्ताने दीर्घकाळ मुक्काम ठोकून आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाेरगरिबांवर उपचार करणारे ससून रुग्णालय आता गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे काय? तसेच ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ड्रगचे रॅकेट चालविणाऱ्या अशा माफियांशी मिलीभगत आहे का? असे सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. दरम्यान, ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात नुकतेच दोन काेटी १४ लाखांचे मेफेड्राॅन जप्त केले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित पाटील ससूनमध्ये महिनोन् महिने उपचाराच्या नावाखाली मुक्काम ठोकून आहे. याआधीही फेक एन्काउंट प्रकरणात अटकेत असलेल्या प्रदीप शर्मा याने ससूनमध्ये असाच पाहुणचार झाेडला हाेता. यानिमित्ताने पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ललित पाटील हा गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठाेकून आहे. अल्सरचा उपचार हा आठवडाभरात हाेऊ शकताे. इतकेच नव्हे तर काेणतीही माेठी शस्त्रक्रिया असाे, जास्तीत जास्त महिनाभरात ताे पेशंट बरा हाेताे. ललित पाटील याला असा काेणता गंभीर आजारही नाही. तरीदेखील तो एवढ्या महिन्यांपासून कुणाच्या आशीर्वादाने राहत आहे? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद असून, ससूनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबतची चाैकशी राज्य शासन करणार का? हा प्रश्नदेखील उपस्थित हाेत आहे. यामध्ये नक्कीच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातातही ललितने ‘लक्ष्मी’ दिल्याची चर्चा ससूनसह वैद्यकीय क्षेत्रात रंगली आहे.

व्हीआयपी कैदी अपवाद...

एकीकडे जेलमध्ये कैदी मरणासन्न अवस्थेत असताना त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मात्र, त्याला ललित पाटीलसारखे ‘व्हीआयपी’ आणि काेट्यधीश रुग्ण अपवाद आहेत. अशांना किरकाेळ उपचारासाठी महिनाेन् महिने राहतादेखील येते. याआधी देखील एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माने येथे सहा महिने मुक्काम झाेडला हाेता. आता ललित पाटीलच्या निमित्ताने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

आधी टीबी, आता अल्सर...

ललित पाटील हा दरवेळी वेगवेगळी कारणे सांगून ससूनमध्ये दाखल झाला आहे. याआधी ताे जिन्यातून पडला म्हणून नंतर टीबी झाला म्हणून त्याने ससूनमध्ये उपचार घेतले. यानंतर त्याने हर्नियावरही उपचार घेतले आणि आता अल्सरच्या उपचारासाठी तब्बल चार महिन्यांपासून तो ससूनमध्ये उपचार घेत असल्याचे समाेर आले आहे.

अधिष्ठात्यांच्या युनिटमध्ये उपचार?

ललित पाटील याच्यावर सध्या अल्सरवर उपचार सुरू आहेत. ते उपचार खुद्द ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांच्याच युनिटमध्ये सुरू असल्याची माहिती ससूनमधील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

ससूनमध्ये कैद्यांची बडदास्त...

याआधी ससून रुग्णालयात डेव्हिड ही ससूनची इमारत कैद्यांच्या उपचारासाठी हाेती. तेथे ना माेबाइल चालत हाेते, ना काेणाला पळून जाण्यासाठी जागा हाेती. आता मात्र शिफ्टिंगच्या नावाखाली कैद्यांना मुख्य इमारतीमध्ये स्वतंत्र व्यवस्था असलेला १६ नंबरचा वाॅर्ड देण्यात आला आहे. येथे आधी अति महत्त्वाच्या (व्हीआयपी) रुग्णांवर उपचार हाेत असत, तर सर्वसामान्य रुग्ण मात्र मेंढरांप्रमाणे वाॅर्डमध्ये जात आहेत.

ताेंड उघडाल तर खबरदार!..

ससूनचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांनी ससूनमधील सर्व डाॅक्टर, कर्मचारी यांनी या प्रकरणाबाबत काेणालाही काही माहीती देऊ नका अशी तंबीच दिली आहे. त्यामुळे येथे काेणी काहीच बाेलत नाही. तसेच या प्रकरणाबाबत डाॅ. ठाकूर यांना फाेनवरून संपर्क केला असता त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.

या प्रकरणाबाबत प्राथमिक अहवाल मी ससूनच्या अधिष्ठात्यांकडून मागवला आहे. तसेच, या प्रकरणाची चाैकशी समिती बसवून चाैकशी केली जाईल.

- डाॅ. दिलीप म्हैसेकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभाग, मुंबई.

Web Title: What is not possible in Yerwada is easily possible in Sassoon, who is giving hospitality to drug mafia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.