माणूस वाचला नाही तर मानवी जीवनाला काय अर्थ? अन् तिने वनसेवेत करिअर करायचे ठरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:33 PM2024-05-12T12:33:09+5:302024-05-12T14:32:10+5:30
मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे आणि संशाेधनाचे काम करायला आवडेल
प्रशांत बिडवे
पुणे : लाेकांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय शाेधण्यासाठी मला आयएएस व्हायचे हाेते. मात्र, लाेकांचे जीवनमान शाश्वत असले पाहिजे. सध्या जागतिक तापमानवाढ, हवामान बदल आणि विविध नैसर्गिक आपत्ती अशी आव्हाने आहेत आणि यातून माणूस वाचला नाही तर मानवी जीवनाला काय अर्थ उरणार आहे? त्यामुळे मी भारतीय वन सेवा क्षेत्रात करिअर करायचे ठरवले असे भारतीय वन सेवा परीक्षेत देशात दुसरी आलेल्या प्रतीक्षा काळे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.
मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या प्रतीक्षा यांनी पदवीनंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. लातूर शहरात बालपण गेले. वडील भूगाेल विषयाचे प्राध्यापक असल्याने घरातूनच बाळकडू मिळाले आणि पर्यावरणाबद्दल आवड निर्माण झाली. आयएएस व्हायचे हाेते मात्र २०१८ मध्ये महाराष्ट्र वनसेवा परीक्षा दिली आणि मुलीतून पहिला क्रमांक पटकावला. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सहायक वनसंरक्षक या पदावर कार्यरत आहेत.
‘सध्या आहे ते जंगल राखणे गरजेचे आहे. वन संरक्षणासाठी कायद्याचा प्रत्यक्षात प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. माझी इंजिनिअरिंगची पार्श्वभूमी आहे. सध्याच्या अनेक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शाेधण्यात येत आहेत. त्यामुळे जंगल संरक्षण आणि संवर्धनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायला मला नक्कीच आवडेल. या क्षेत्रात काम करायला खूप संधी आहे.
विज्ञान शाखेची पदवी गरजेची
वनसेवा क्षेत्रात करिअर करायचे असेल तर विज्ञान शाखेतून पदवी घेणे गरजेचे आहे. यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा आणि वन भारतीय वन सेवा दाेन्ही परीक्षेची पूर्वपरीक्षा एकच आहे.
जंगल म्हणजे केवळ झाड नाही
सध्या मी सहायक वनसंरक्षक म्हणून काम करीत आहे. त्यामुळे माझ्या काही संकल्पना स्पष्ट हाेत आहेत. जंगल म्हणजे केवळ झाड नाही तर एक परिसंस्था ‘इकाेसिस्टम’ आहे. एका झाडासाेबत त्याचे मूळ, फांदीवर जैवविविधता आहे आणि त्याबाबत जनजागृती केली जात आहे.
पर्यावरण संवर्धनाला सीमांचे बंधन नाही
जंगल, जैविक परिसंस्था या काेणताही जिल्हा, राज्य आणि देशापुरत्या मर्यादित नाहीत. जागतिक तापमानवाढ संकटामुळे त्याचा आपल्याला अंदाज आला आहे. एका देशाचा दुसऱ्या देशावर कसा परिणाम हाेऊ शकताे? हे दिसत आहे. त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाचे आणि संशाेधनाचे काम करायला आवडेल. - प्रतीक्षा काळे, भारतीय वनसेवा परीक्षा देशात दुसरा क्रमांक