‘ससून’च्या अधिष्ठातापदाचे गाैडबंगाल काय? काेर्टाचा निकाल लागूनही काळेंची ऑर्डर निघेना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 09:35 AM2023-11-27T09:35:53+5:302023-11-27T09:36:32+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केले...
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता काेण हाेणार, याचा पेच सुटण्याऐवजी ताे वाढतच चालला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त केले. परंतु, वैद्यकीय शिक्षण विभागाने अद्याप डॉ. विनायक काळे यांना रुजू होण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे सध्या प्रभारी अधिष्ठाताच ससून चालवत आहेत.
ललित पाटील प्रकरणात आधीचे अधिष्ठाता डाॅ. संजीव ठाकूर यांना पद गमवावे लागले. तसेच उच्च न्यायालयानेही त्यांची नियुक्ती अवैध ठरवली हाेती. त्यामुळे हे पद सध्या रिक्त असून, सध्या ससूनमधील वरिष्ठ अधिकारी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.
डीनपदाची माळ काेणाच्या गळ्यात?
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण विभाग अजूनही डॉ. काळे यांची ऑर्डर काढत नसल्याने त्यांच्याऐवजी लातूर, मुंबई, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर येथील व्यक्तीची डीन म्हणून नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. ससूनमधील ललित प्रकरण, प्रशासकीय गोंधळ आणि अंतर्गत राजकीय संघर्ष यामुळे तिसऱ्याच व्यक्तीच्या गळ्यात डीनपदाची माळ पडणार असल्याची चर्चा आहे. तर डॉ. काळे यांनी शासनाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना ‘साईड पोस्टिंग’ मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. परंतु, वेळ आल्यावर काळे की आणखी काेणी, याचे उत्तर लवकरच मिळेल.