...कशी नशीबाने थट्टा आज मांडली! एसटी चालकावर चक्क 'बिगारी' काम करण्याची वेळ आली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 12:48 PM2020-10-30T12:48:18+5:302020-10-30T13:19:16+5:30
कोरोनामुळे नशिबाने मांडलेली थट्टा कधी थांबणार हा प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहे.
अमोल यादव -
बारामती : सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी एसटीची सेवा मर्यादित प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे चालक,वाहकाला महिन्यात आठ दिवसच कामावर बोलविण्यात येते. बारामती एसटी आगारातील अशोक जंगले यांच्यावर कुटुंबाच्या पोटाची भूक भागवण्यासाठी सध्या गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करण्याची वेळ आली आहे. जंगले यांची कोरोनामुळे नशिबाने मांडलेली थट्टा कधी थांबणार हा प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहे.
बारामती एसटी आगारातील अशोक मोतीराम जंगले मागील दहा वर्षांपासून चालक म्हणून काम करत आहेत. जंगले हे मुळचे यवतमाळ जिल्ह्यातील पोकळी गावचे रहिवासी आहेत. पण नोकरीनिमित्त ते मागील दहा वर्षांपासून बारामतीमध्ये वास्तव्यास आहेत. एसटीमध्ये ते कायमस्वरूपी चालक म्हणुन कामावर आहेत. सध्या कोरोना संसर्गामुळे बऱ्याच एसटी बस बंद आहेत. त्यांना महिन्यातील आठ दिवस काम असते.
जंगले म्हणाले, एसटीची नोकरी करताना ३५० रुपये रोज मिळतो. घरी कुटुंबात पत्नी व दोन मुले अशी चार माणसे आहेत. सध्या एसटीच्या पगारात परवडत नाही म्हणून मग काम नसेल त्यादिवशी बिगारी काम करतो. येथे ४०० रुपये हजेरी मिळते,असे जंगले सांगतात. या पगारात परवडत नसल्याने वयस्कर आई- वडिलांना गावाकडे पाठवले सांगताना त्यांना गहिवरून आले. आम्ही एसटी क्वार्टरमध्ये राहायला होतो. तेव्हा पगारातून घरभाडे कपात होत असे. एसटी वसाहत नव्याने बांधण्यात येणार असल्याने तेथून घर सोडण्याची सुचना एसटी प्रशासनाने आम्हाला केली आहे. त्यातुन बाहेर घर मिळायला खूप त्रास झाला. भाडे देखील महिन्याच्या महिन्याला द्यावे लागत आहे. पण बिगारी हे काम जरी जड असले तरी कुटुंबासाठी हे काम करताना फार हलके वाटते, असे हसत- हसत डोळे भरून आलेल्या जंगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दोन महिने पगार नाही पोटाला काय खाणार म्हणून बिगारी काम करत आहे. कोणत्याही कामाला लाजत नाही. माझ्याकडे रेशनकार्ड नाही. त्यामुळे धान्य विकत आणावे लागते. तीन महिन्यांपूर्वी मुलाच्या दवाखान्याला व धान्यासाठी पैशांची गरज असल्याने बायकोच्या अंगावरील होते नव्हते ते दागिने मोडावे लागले. आम्हाला ड्युटीचा मेसेज व्हाट्सअप वर येतो .पण कधीकधी पैशाअभावी मोबाईल रिचार्ज केलेला नसतो. त्यावेळी मेसेज न मिळाल्याने कामाला दांडी पडते. हतबलतेचा कळस झाला,आता सहन होत नाही, असेही जंगले यांनी सांगितले.