‘दुधाला एकटं ठेवतो का?’, ‘डाग चांगले आहेत’ हे कसले मराठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:12 AM2021-03-23T04:12:25+5:302021-03-23T04:12:25+5:30
“आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या प्रांतातील भाषा ही आपली मातृभाषा असते. ती आपण आत्मसात केली पाहिजे. भाषेला धर्म नसतो. ...
“आपण ज्या ठिकाणी राहतो, त्या प्रांतातील भाषा ही आपली मातृभाषा असते. ती आपण आत्मसात केली पाहिजे. भाषेला धर्म नसतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची मातृभाषा मराठी आहे आणि त्याचा आपल्याला अभिमान हवा,” अशा शब्दांत ज्येष्ठ मराठी भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांनी मराठीचे महत्व अधोरेखित केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे यंदाचा ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ डॉ. यास्मिन शेख यांना जाहीर झाला आहे. या निमित्ताने ९६ वर्षीय डॉ. शेख यांच्याशी ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
-प्रज्ञा केळकर-सिंग
-----------
* मराठी भाषेची गोडी कशी निर्माण झाली?
- लहानपणापासूनच मराठी भाषेवर विशेष प्रेम होते. मराठी हीच माझी मातृभाषा. शाळेत असल्यापासून मी कथा लिहायला सुरुवात केली. शालेय शिक्षण पंढरपूरमधील आपटे प्रशाला आणि नाशिकमधील गर्व्हमेंट गर्ल्स स्कुलमध्ये झाले. पंढरपूरच्या शाळेतील मराठीच्या शिक्षकांनी भाषेची गोडी लावली. घरी आई-वडील खूप वाचन करत. घरी खूप पुस्तके, मासिके असायची. त्याचाही प्रभाव होताच. महाविद्यालयात असताना अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. एसपी कॉलेजमध्ये मराठी विषयात पदवीचे शिक्षण घेत असताना श्री. म. माटे, के. ना. वाटवे यांच्यासारखे शिक्षक लाभले. माटे सर आम्हाला ‘व्याकरण आणि भाषाशास्त्र’ शिकवत. तेव्हा पदवी अभ्यासक्रमात नव्यानेच हा विषय समाविष्ट झाला होता. सरांमुळे मराठीची अधिक गोडी निर्माण झाली. मी ‘आयएएस’च्या विद्यार्थ्यांना १० वर्षे मराठी भाषा शिकवली. सायनमधील एसआयईएस कॉलेजमध्ये मी मराठी विषयाची प्राध्यापिका म्हणून काम पाहिले.
* मराठी भाषा शिकवण्याची पूर्वीची पद्धत आणि आताची पद्धत यात तफावत जाणवते का?
- मराठी भाषा शिकवण्याच्या पद्धतीत निश्चितच तफावत जाणवते. आजच्या काळात सर्वच शिक्षक उत्तम मराठी शिकवतात असे नाही. व्याकरणाचे ज्ञान देण्यावर फार भर दिला जात नाही. हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा मोठा प्रभाव मराठीवर दिसतो. त्यामुळे भाषेची अक्षरश: चिरफाड झालेली दिसते. मालिका, जाहिरातींमधून तर सर्रास भाषेची मोडतोड केली जाते. मुलांवर आजकाल दूरचित्रवाणीचा जास्त प्रभाव आहे. तिथून कानावर पडणारी मराठी भयानक असते. ‘आपण दुधाला एकटं ठेवतो का’ किंवा ‘डाग चांगले आहेत,’ अशी निरर्थक वाक्यरचना वापरली जाते. इंग्रजी, हिंदी बोलताना आपण मराठी शब्द वापरतो का? मग मराठी बोलताना सरमिसळ कशासाठी? एखादा पर्यायी शब्द उपलब्ध नसेल तर इतर रुळलेले शब्द वापरायला हरकत नाही. मात्र, भाषेची सध्याची मोडतोड अतिशय दुःखदायक आणि चिंतेचा विषय ठरत आहे.
* मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी एवढा विलंब योग्य आहे का?
- मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्यास विलंब होत आहे. जोरदार प्रयत्न सुरू असूनही दर्जा का दिला जात नाही, याचे आश्चर्य वाटते. दर्जा मिळाल्यास निधी उपलब्ध होईलच. मात्र, ते महत्वाचे नाही. भाषा अभिजात करायची असेल तर आधी भाषेचे स्वरूप टिकले पाहिजे. भाषेची मोडतोड, इतर शब्दांची सरमिसळ, वाक्यांची चुकीची रचना असे सुरू राहिले तर अभिजातता कशी टिकेल?
* मराठी भाषेला दुययम महत्व दिले जाते असे वाटते का?
- इंग्रजीबद्दल कमालीची ओढ आणि मराठीचा न्यूनगंड यामुळे मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. विद्यार्थी संख्या कमी असल्याने अनेक शाळा बंद करण्याची वेळ आलेली आहे. सर्वत्र इंग्रजीचा प्रभाव वाढलेला दिसतो. मुलाला इंग्रजी माध्यमात प्रवेश घेणे पालकांना प्रतिष्ठेचे वाटते. मात्र, मराठी माध्यमात शिकल्याने काहीही अडत नाही. मातृभाषेबद्दल तुच्छ भावना कशासाठी? आपल्या भाषेबद्दल आपल्या मनात न्यूनगंड निर्माण होण्याची गरज नाही. भारतातील इतर राज्यांत मातृभाषा प्राणपणाने जपली जाते. दैनंदिन व्यवहारही मातृभाषेतच होतात.
* लहान मुलांना भाषेची गोडी कशी लावता येईल?
- पालकांकडून मातृभाषा जपण्याचे, जोपासण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. मुले इंग्रजी माध्यमात शिकत असली तरी घरात मराठी बोला, वाचा, चर्चा करा. मुलांवर भाषेचे संस्कार हे आई-वडिलांकडून झाले पाहिजेत. मात्र, पालकच त्यांच्याशी इंग्रजीत बोलण्याचा अट्टाहास धरतात. मराठी विद्यापीठ, मराठी भाषा भवन यासाठीचा पाठपुरावा आणि मागणी योग्यच आहे. मात्र, मराठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी कधी प्रवेश घेतील? जर त्यांना लहानपणापासून मराठीची गोडी लागलेली असेल तरच...
* प्रमाण भाषा आणि शुद्ध भाषा हा वाद कायम ऐकायला मिळतो. कोणती भाषा योग्य आहे?
- औपचारिक लेखनामध्ये प्रमाणभाषा वापरली पाहिजे, याबाबत दुमत नाही. मात्र बोलीभाषांमुळे मराठी भाषा समृद्ध होत जाते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले. भाषेचे संरक्षण करणे हे प्रत्येक मराठी माणसाचे कर्तव्य आहे. विशेषतः सुशिक्षित नागरिकांची ती जास्त मोठी जबाबदारी आहे. मात्र, सुशिक्षित लोकांमध्येच इंग्रजी भाषेचा जास्त अभिमान पाहायला मिळतो. भाषाशास्त्राच्या दृष्टीने भाषेमध्ये आपल्याही नकळत हळूहळू परिवर्तन घडत असते. त्यामुळेच पूर्वीचे मराठी साहित्य आणि आताचे मराठी साहित्य यात बरीच तफावत पाहायला मिळते. कालानुरूप भाषेत बदल होणारच, मात्र शब्दांची सरमिसळ नको. आपली भाषा आपण जपली पाहिजे असे प्रत्येकाला वाटेल, तेव्हाच आपली मराठी जगेल, टिकेल आणि समृद्ध होईल. मराठीची मोडतोड थांबवणे आपलेच कर्तव्य आहे.