निसर्गाला धक्का देऊन कसले ब्यूटीफिकेशन? नदीकाठ सुधार प्रकल्प थांबवा, खासदारांच्या पालिकेला सूचना
By श्रीकिशन काळे | Updated: January 23, 2025 12:15 IST2025-01-23T12:14:51+5:302025-01-23T12:15:00+5:30
गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नदीला पूर आल्याने सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे, म्हणून नदीकाठ सुधार हा प्रकल्प पर्यावरणाला धोकादायक

निसर्गाला धक्का देऊन कसले ब्यूटीफिकेशन? नदीकाठ सुधार प्रकल्प थांबवा, खासदारांच्या पालिकेला सूचना
पुणे : ‘‘राम व मुळा नदी संगमावर भराव टाकला जात आहे. नदीपात्रात भर टाकून पात्र कमी केले जात आहे. हे काम थांबविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. येथे दोनशे वर्षांपूर्वीची दुर्मिळ झाडे काढली जाणार आहेत. डीपीआर तयार आहे, तयार नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. झाडे तोडली जात आहेत. मागच्या पावसाळ्यात येथे पूर आलेले आहेत. त्यामुळे हे सर्व पर्यावरणाची हानी होत आहे, ते त्वरीत बंद झाले पाहिजे, याबाबतच्या सूचना मी दिल्या आहेत, अशी माहिती खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली.
राम नदी, मुळा नदीच्या संगमावर भराव टाकून पिंपरी चिंचवड पालिका आणि पुणे महापालिका यांच्या वतीने नदीकाठ सुधार काम केले जात आहे. या प्रकल्पामुळे प्रचंड निधी तर खर्च होतच आहे, पण निसर्गाची मोठी हानी होत आहे. ते थांबविण्यासाठी खासदार मेधा कुलकर्णी या गुरूवारी सकाळीच साडेसात वाजता नदीकाठी आल्या. त्यांच्यासोबत पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले व इतर अधिकारी उपस्थित होते. जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, प्राजक्ता महाजन, डॉ. श्रीकांत गबाले, पुष्कर कुलकर्णी, गणेश कळमकर आदी उपस्थित होते. सर्वांनी नदीपात्राची पाहणी केली. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी तिथूनच पिंपरी आयुक्त शेखर सिंह यांना फोन लावून काम त्वरीत बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनाही फोन करून याविषयी माहिती दिली आणि लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे सांगितले.
तब्बल तीन तास खासदार मेधा कुलकर्णी यांनी नदीपात्रात सर्वत्र फिरून माहिती घेतली. कोणकोणती झाडे तोडली जाणार ते जाणून घेतले. तसेच नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे काय धोका आहे, ते देखील पर्यावणतज्ज्ञांनी त्यांना सांगितले. हे सर्व ऐकल्यानंतर हा मुद्दा संसदेमध्येही उपस्थित करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
कसले ब्यूटीफिकेशन करताय ?
गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने नदीला पूर येत आहेत. त्यामध्ये सामान्य नागरिकांचे नुकसान होत आहे. म्हणून नदीकाठ सुधार हा प्रकल्प पर्यावरणाला धोकादायक आहे. निसर्गाला धक्का देऊन कसले ब्यूटीफिकेशन करताय ? असा सवालही मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केला.