शरद पवार कसले परिवर्तन करणार? ते तर आम्ही करू; परिवर्तन महाशक्तीचे १५० जागांवर एकमत

By राजू इनामदार | Published: October 17, 2024 06:36 PM2024-10-17T18:36:12+5:302024-10-17T18:36:34+5:30

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही गरीब कष्टकरी वर्गाच्या घरातील अंधार काही मिटलेला नाही, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही मैदानात

What kind of change will Sharad Pawar make? We will do that; Consensus of Parivartan Mahashakti on 150 seats | शरद पवार कसले परिवर्तन करणार? ते तर आम्ही करू; परिवर्तन महाशक्तीचे १५० जागांवर एकमत

शरद पवार कसले परिवर्तन करणार? ते तर आम्ही करू; परिवर्तन महाशक्तीचे १५० जागांवर एकमत

पुणे: शरद पवार कसे परिवर्तन करणार? तो तर आमचा अधिकार आहे व आम्हीच ते करू अशा शब्दांमध्ये शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. परिवर्तन महाशक्ती चे विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील १५० जागांवर एकमत झाले असल्याचे दावा यावेळी शेट्टी, प्रहार अपंग संघटनेचे बच्चू कडू व स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांनी केला.

स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात गुरूवारी दुपारी परिवर्तन महाशक्ती या नावाने शेट्टी, कडू, संभाजी राजे तसेच शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप व अन्य संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. परिवर्तन महाशक्तीमध्ये समविचारी अशा तब्बल ३० ते ४० संघटना सहभागी झाल्या आहेत. आमचे सर्वांचे विधानसभेच्या १५० जागांवर एकमत झाले आहे. काही जागा दोनदोन पक्ष किंवा संघटनांना हव्या आहेत. तुमच्यामध्ये चर्चा करून तुम्हीच त्यावर निर्णय घ्या असे त्यांनी सांगितले आहे. लवकरच आम्ही आमची यादी जाहीर करू असे या नेत्यांनी सांगितले.

राज्यात मोजकीच काही घराणी गेली अनेक वर्षे राज्यकर्ते आहेत. त्यांनी कष्टकरी वर्गाला कायमच उपेक्षित, वंचित ठेवले. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही गरीब कष्टकरी वर्गाच्या घरातील अंधार काही मिटलेला नाही. या सगळ्याला उत्तर देण्यासाठी, गरीबांनी न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत. प्रस्थापितांना बाजूला करणे व जनतेच्या हातात राज्य देणे हा आमचा उद्देश आहे. त्याला जनतेची चांगली साथ मिळते आहे. आमचे उमेदवार आम्ही जाहीर करूच, त्यांच्याकडून आमच्याकडे कोणी येणार असेल तर त्यांची पात्रता, उमेदवारीचे आमचे निकष पाहून आम्ही त्यांचेही स्वागत करू, ही लढाई जनतेच्या साथीनेच आम्ही जिंकणार आहोत असे शेटी, कडू व छत्रपती संभाजी राजे यांनी सांगितले.

मी महाविकास आघाडी सोडली, कारण त्यांच्या सत्तेच्या काळात त्यांनी शेतकऱ्यांचे अहित करणारे अनेक निर्णय घेतले. उसाच्या एफआरपीची मोडतोड करण्याचे काही कारण नव्हते व तसा अधिकारही त्यांना नव्हता तरीही तो निर्णय त्यांनी घेतला.- राजू शेट्टी, स्वाभीमानी शेतकरी संघटना

मी महायुती सोडली, कारण आमच्या १७ मागण्यांना त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. दिव्यांग मंत्रालय दिले मात्र पुढची काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काही भले होईल असे वाटले नाही.- बच्चू कडू, प्रहार अपंग क्रांती संघटना

छत्रपती शाहू महाराज यांच्या निवडणुकीत मी त्यांचा मुलगा म्हणून माझे पूर्ण योगदान दिले. ते विजयी झाल्यावर मी काँग्रेसबरोबर कोणताही संबध ठेवलेला नाही. स्वराज्य पक्ष व आता परिवर्तन महाशक्ती यांचेच काम आम्ही करतो आहोत व तेच करणार आहोत.- छत्रपती संभाजी राजे- स्वराज्य पक्ष

Web Title: What kind of change will Sharad Pawar make? We will do that; Consensus of Parivartan Mahashakti on 150 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.