एकतर्फी प्रेम कसले ‘पटवायचे’ म्हणून लागतात मागे; टवाळखोरांकडून शाळकरी मुलींचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 05:14 PM2022-03-16T17:14:48+5:302022-03-16T17:14:56+5:30
मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे
तन्मय ठोंबरे
पुणे : ‘एकतर्फी प्रेम’ म्हणणे म्हणजे खूप सुसंस्कृतता, मुलींना ‘पटवायचे’ म्हणून मागे लागणाऱ्या टवाळखोरांचा छळ अनेक मुलींना सहन करावा लागत आहे. आत्तापर्यंत हा त्रास केवळ शाळेच्या परिसरात होता. परंतु, सगळ्यांच्याच हातात मोबाईल आल्यामुळे आता घरापर्यंत आला आहे. मुलीच्या वर्गातीलच मुलाकडून तिचा मोबाईल नंबर मिळवून फोनवर त्रास देण्याचे प्रमाणही वाढले आहे.
शाळेत जाऊन एका मुलीवर चाकूहल्याचा प्रकार नुकताच घडला. या पार्श्वभूमीवर शाळांच्या परिसरातील तसेच काही मुलींशी संवाद साधला. शाळेच्या आवारात काही टवाळखोर मुले बसलेले असतात. शाळेतील एखाद्या विद्यार्थ्यांशी मैत्री करतात. त्याच्याकडून ठराविक मुलीची माहिती काढून घेतात. त्यापैकी एखादी मुलगी या विद्यार्थ्याच्या परिचयाची आहे का, हे पहिले जाते. त्यानंतर हे टवाळखोर त्या मुलीची छेड काढण्यास सुुरुवात करतात आणि पाठलागही करतात. मुली बसस्टॉपवर थांबल्यावर त्यांच्यासमोर जाऊन गाणे वाजवणे, गाड्यांचे हॉर्न वाजवणे असे प्रकार केले जातात. हे सर्व पाहून मुलगी घाबरून शेवटी निघून जाते, असे आसपासच्या लोकांनी सांगितले.
तुम्हीपैसे नका देऊ, आम्ही देतो
- टवाळखोर मुलं वर्गातील मुलांना दमदाटी करून त्यांच्याकडून आमचे नंबर मिळवतात. त्यानंतर आम्हाला वारंवार फोन करून त्रास देतात. अनेकदा आम्ही आई किंवा बाबांचा नंबर शाळेच्या स्टुडंट डायरीत देतो. त्यावेळी त्या नंबरवर फोन केला जातो. त्यानंतर कुटुंबाकडून याबाबत आमची चौकशी होते.
- शाळेच्या आवारात असणाऱ्या गोळा विक्रेत्याने सांगितले की, मुली जेव्हा माझ्याकडे गोळा घेण्यासाठी येतात तेव्हा समोर असणारी काही मुले लांबूनच आवाज देत, ‘’तुम्ही पैसे नका देऊ, आम्हीच देतो’’ असे म्हणतात. त्यावेळी मुली घाबरून गोळा न घेता पटकन निघून जातात
मुलींसाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार
ऑनलाइन शिक्षणामुळे आता विद्यार्थ्यांकडेही स्वत:चे मोबाईल आहेत. मुलींचा स्वत:चा मोबाईल असेल तर अनेकदा सतत फोन येत राहतात. त्यामुळे या मुलींचा मानसिक कोंडमारा होताे. घरच्यांकडूनही तुझा मोबाईल नंबर त्याच्याकडे गेलाच कसा, असेही विचारले जाते.