Sonali Kulkarni :'इंग्रजीत पोस्ट लिहिली तर म्हणे तुझे चित्रपट पाहणे बंद करू', असे टोमणे का मारावेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 03:58 PM2021-12-14T15:58:57+5:302021-12-14T15:59:07+5:30
आपण फक्त मराठी भाषेसाठीच काम करतो का? आपल्याला समृद्ध व्हायचंच नाहीये का? अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी टीका करणाऱ्यांचे कान टोचले
पुणे : सोशल मीडिया हे अभिव्यक्ती आणि संवादाचे एक प्रभावी माध्यम आहे. एखादी पोस्ट जर मराठीमध्ये लिहिली तर ‘तुलाच मराठीचा किती अभिमान आहे, म्हणून कौतुक केले जाते; पण जर एखादी पोस्ट इंग्रजीमध्ये लिहिली, तर आता तुझे चित्रपट पाहाणेच बंद करू, तुझ्या चित्रपटांवर बंदी आणू’, असे टोमणेदेखील मारले जातात. आपण फक्त मराठी भाषेसाठीच काम करतो का? आपल्याला समृद्ध व्हायचंच नाहीये का? अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेत्री व लेखिका सोनाली कुलकर्णी यांनी टीका करणाऱ्यांचे कान टोचले. आपल्या भाषेचा अभिमान असायलाच हवाच; पण इतर भाषेमध्ये लिहिले तर नाराजीचा सूर नको, असेही तिने परखडपणे सांगितले.
ग्रंथाली प्रकाशित रेणू दांडेकर यांच्या ‘प्रिय प्रतिमास रेणूकडून’ , ‘सृजनाच्या नव्या वाटा’ , ‘वय झाल्यावर’ या तीन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ पत्रकार भवन येथे पार पडला. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, शिक्षणतज्ज्ञ व लेखिका सुचेता पडळकर, जडणघडण मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले.
कुलकर्णी म्हणाल्या, ‘अनेकदा आत्मकथनात्मक पुस्तक लिहिताना, मी कितीदा त्रास भोगला, मला एकही पुरस्कार मिळाला नाही. बऱ्याचवेळा आत्मसंवाद असला तरी खंत मांडली जाते. पण ती अनेकदा बोचरीपण होऊ शकते. हे लेखकाच्या लक्षातही येत नाही. काही पुस्तकांची चीडही येते की दु:ख मांडून यातून काय साध्य होईल. पण रेणू दांडेकर यांच्या आत्मसंवादात्मक पुस्तकामध्ये मी किती भाग्यवान, मला काहीच येत नव्हते आणि मी किती मोठी झाले याचा कुठेही उल्लेख नाही. त्यांचे पुस्तक वाचून जणू माझं जुनं मन मला मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पडळकर म्हणाल्या, आरटीआय आणि नवीन शैक्षणिक धोरणांमुळे मनात चलबिल आहे. महाराष्ट्रात प्रयोगशील शाळा निर्मित व्हायला हव्यात. सृजनाच्या वाटा पुस्तकातून मी माझी शाळा तपासून पाहात होते.