काय म्हणावं पुणेकरांना! गटाराचा वापर होतोय कचरा पेटीसारखा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 12:25 PM2020-10-19T12:25:24+5:302020-10-19T12:26:16+5:30
ड्रेनेज लाईनमध्ये गोधड्या, डायपर आणि हाडे
पुणे : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. रस्तोरस्ती आणि चौका-चौकात पाणी साठले होते. परंतु, ही परिस्थिती निर्माण होण्यास 'न-झालेली' सफाई कारणीभूत ठरली आहे. पावसाळी आणि ड्रेनेज लाईनमध्ये गोधड्या, गाद्या, डायपर्स, प्लास्टिक पिशव्या, लाकडे आणि मोठाली हाडेसुद्धा अकडल्याचे स्वच्छतेदरम्यान समोर आले आहे.
थोडा जरी पाऊस झाला तरी शहरात पावसाचे पाणी साठून राहते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहात होते. ड्रेनेज लाईन आणि चेंबरमधून मोठ्या उकळ्या फुटून हे पाणी बाहेर पडत होते. पाणी जायला मार्गच नसल्याने हे पाणी रस्त्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाळी वाहिनीची आणि ड्रेनेजची व्यवस्थित स्वच्छता न झाल्याने हा प्रकार घडला आहे. अनेक ठिकाणी गटारामधून मोठ्या गाद्या, गोधड्या, मोठी डायपर्स आणि लाकडे तसेच हाडे अडकल्याचे स्वच्छता करताना पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. ही सर्व घाण बाहेर काढल्यानंतर पाणी पाण्याचा मार्ग सुरळीत झाल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यासोबतच जागोजाग घुशी लागल्याने जमीन भुसभुशीत झाली असून माती या गटारांमध्ये आल्याने पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे.
शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने जागोजागी पाण्याची तळी साठतात. पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजलाईन वाढत्या लोकसंख्येमुळे कमी पडत असल्याचे कारण प्रशासनाकडून आणि नगरसेवकांकडून देण्यात येते. परंतु, या वाहिन्यांची व्यवस्थित स्वच्छता होत नसल्यानेच जागोजागी पाण्याची तळी साचत असल्याचे समोर आले आहे. गटारामधून आणि गटाराच्या चेंबरमधून पाणी बाहेर पडत होते. रस्त्यावर आलेल्या मैलापाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटली होती. तसेच गाळ, कचरा देखील वाहून आला होता. रस्त्यावर आलेल्या या कचऱ्यामुळे सर्वत्र अस्वच्छता पसरली होती. मुळातच ड्रेनेजलाईनमध्ये नागरिक घरातील कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, लाकडे, हाडे, डायपर्स, कपडे, गोधड्या आणि गाद्या टाकत असल्याने नागरिकांनाच यामुळे उद्भवणाऱ्या संकटाचे गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व कचऱ्याचा अडथळा पाण्याच्या प्रवाहाला होत आहे. ड्रेनेज लाईन मध्ये हा कचरा अडकून पडल्यामुळे वहन क्षमता कमी झाली असून त्यामुळे हे पाणी ड्रेनेज लाईन मधून रस्त्यावर येते. गटारांमध्ये अशा प्रकारचा कचरा टाकण्याचे प्रमाण झोपडपट्टीबहुल तसेच चाळी असलेल्या भागांमध्ये अधिक असल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
---------
नागरिक घरातील स्वच्छता करतात आणि नको असलेल्या कचरा गटारात अथवा चेंबरमध्ये टाकत असल्याचे दिसते आहे. गाद्या, गोधड्या, लाकडे, हाडे, चिंध्या, कपडे आदी साहित्य ड्रेनेज लाईनमध्ये अडकलेले होते. या कचऱ्यामुळे गटारे तुंबून पाणी रस्त्यावर आले. नागरिकांनी हा कचरा ड्रेनेजमध्ये न टाकता पालिकेच्या यंत्रणेमार्फत द्यावा.
- पप्पू खंदारे, मोकादम, प्रेमनगर आरोग्य कोठी