पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 06:36 PM2018-03-31T18:36:27+5:302018-03-31T18:36:27+5:30

पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही.

What is the secret of pumped water? | पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

पिंपळेतल्या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय?, विषारी औषध टाकल्याचा संशय

googlenewsNext
ठळक मुद्देफळबागांचे नुकसान : मुलांच्या अंगावर दिसतायत लालसर चट्टे तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार

पुणे : पुरंदर तालुक्यात पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. तसेच विहिरींचा पाणीसाठाही आटू लागला आहे. त्यामुळे पिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. मात्र, तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी विठ्ठल नारायण खेनट आणि अनंता कृष्णा क्षीरसागर यांच्या शेतातील सामूहिक विहिरीतील पाणी अचानक फेसाळले, या फेसाळलेल्या पाण्याचे गूढ काय आहे हे अद्यापही कळू शकले नाही. परंतु , या फेसाळलेल्या दूषित पाण्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतातील पेरू, सिताफळ आणि आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.   
   पिंपळे (ता. पुरंदर) येथील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून पेरू, सिताफळ आणि आंब्याचे पीक घेत आहेत. फळबागांसाठी या दोन्ही शेतकऱ्यांनी साडेसहा एकर क्षेत्रात सामूहिक विहीर तयार केली आहे. त्याच विहिरीवर हे दोन्हीही शेतकरी आपल्या बागांना पाणी देतात. मात्र, २ दिवसांपूर्वी अनंता क्षीरसागर हे पहाटे फळबागांना पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना अचानक विहिरीतील पाण्यावर फेस आल्याचे दिसले. त्या वेळी त्यांना या फेसामागचे गूढ उकलले नाही. त्यांनी विहिरीतील हेच फेसाळलेले पाणी पेरू, सीताफळ आणि आंब्याच्या बागांना दिले, त्यामुळे या दूषित पाण्यामुळे संपूर्ण पीक पिवळे पडून जळायला लागले आहे. दूषित पाण्याच्या वापरामुळे या शेतकऱ्यांच्या घरातील महिला आणि लहान मुलांच्या अंगावर लालसर चट्टे पडून त्यांंना त्वचेचे विकार जडले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शेतातील पिकांसोबत जनावरांनाही या दूषित पाण्याचा त्रास होत आहे.
विहिरीत कुणीतरी विषारी औषध टाकल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे विहिरीतील पाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापूर्वीही या शेतकऱ्यांच्या शेतातील वीजवाहक वायर कापून वीज खंडित करण्याचा काही अज्ञातांनी प्रयत्न केला होता.शिवाय काढणीला आलेल्या गव्हाच्या पेंढीत छोटे दगड ठेवून त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता, त्या वेळी या शेतकऱ्यांनी या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केले होते. या वेळी मात्र त्यांनी यासंदर्भात सासवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनंता क्षीरसागर व विठ्ठल खेनट यांंनी केली आहे. 

....................................

याबाबत तहसीलदार, तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्त नुकसानीचा पंचनामा करणार असून, नुकसानीनुसार त्यांना मदत दिली जाईल. तसेच दूषित पाण्याचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. 
 - देवेन्द्र ढगे, तालुका कृषि अधिकारी,पुरंदर 

Web Title: What is the secret of pumped water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.