‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच...?’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 12:25 PM2023-03-31T12:25:20+5:302023-03-31T12:30:02+5:30

कारखाना सुरू होताना आठ ते दहा हजारांच्या आसपास ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर येत असतात...

What should I go to the village to eat Should we lie down in front of the animals | ‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच...?’

‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच...?’

googlenewsNext

- महेश जगताप

सोमेश्वरनगर (पुणे) : जिह्यातील ऊसतोड हंगाम आता संपला असून, बहुतांश कारखान्यांनी चिमण्या बंद केल्या आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच कारखाने एक ते सव्वा महिने आधी बंद झाले आहेत. ऊसउत्पादक शेतकरी व कारखानदार निवांत झाले असले, तरी साखर उद्योगातील तिसरा घटक असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या जीवाला मात्र घोर लागला आहे. कारखाने बंद होऊन तीन दिवस झाले तरी ऊसतोडणी मजुरांचा पाय काही घराकडे निघेना. ऊसतोडणी मजुरांना गावाकडे कधी जाणार, असा प्रश्न विचारला असता, ‘गावाकडं जाऊन काय ढेकळं खायची काय; जनावरांपुढं आडवं पडावं का आम्हीच..?’ असे उत्तर बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रोहोतवाडीच्या सुनीता नागरगोजे व चंद्रकांत नागरगोजे यांनी दिले.

सोमेश्वर कारखाना बंद होऊन आता तीन दिवस उलटत आले; पण ऊसतोडणी कामगार काही गावाकडे जायचं नाव घेत नसल्याचे दिसत आहे. जे काही जात आहेत ते उगाच जायचं म्हणून जड अंत:करणाने जात आहेत. कारण यावर्षी जिल्ह्यातील साखर कारखान्यांसह सोमेश्वर कारखाना देखील एक महिना लवकर बंद झाला होता. त्यामुळे आता गावाकडे जाऊन काय करणार? असा सवाल पिठीनायगावचे ऊसतोडणी कामगार सीताराम खिलारे यांनी सांगितले.

दरवर्षी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ऊस हंगाम चालतो. त्यामुळे ऊसतोडणी कामगारांच्या हाताला काम मिळते, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटतो; पण आता पावसाळा सुरू होण्यास अजून अडीच महिने कालावधी आहे. त्यामुळे गावाला पाणी, जनावरांना विकत चारा घ्यावा लागतो. त्यासाठी आता मुकादमाकडून पुन्हा उचल घेयची... आणि मुलांच्या शाळा, लग्न यांचा खर्च करायचा. आमचं कर्ज कधीच फिटत नाही. पाहिलेतेच एक लाख अंगावर असताना आता अजून एक लाख कर्ज करून ठेवायचं... तर दुष्काळ असल्याने हाताला काम मिळत नाही.

दुसरीकडे मजुरीला जाऊन पोट भरायचं... चांगली बैलं विकून जमत नाही... पुन्हा बैल मिळत नाहीत. त्यामुळे विकत चारा घेऊन का होईना बैलांना सांभाळावे लागते. तसं तर गावाकडे जाऊच वाटत नाही... इथं राहून कमीत कमी हाताला काम आणि जनावरांना मुबलक पाणी आणि चारा तरी मिळतो, असे बीड जिल्ह्यातील रोहोतवाडीच्या सुनीता नागरगोजे यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याने चालू गळीत हंगामात पाच हजार प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या साखर कारखान्याचे विस्तारीकरण करीत तो साडेसात हजार प्रतिदिन गाळप क्षमतेचा केला. त्यामुळे गेल्या हंगामात एवढाच ऊस गाळप करण्यासाठी ‘सोमेश्वर’ला एप्रिलअखेर आला होता.

यावर्षी गाळप क्षमता वाढविल्याने तेवढाच ऊस गाळप करण्यासाठी कारखाना २७ मार्चलाच बंद करावा लागला. चालू हंगामात ‘सोमेश्वर’ने ११.५० च्या साखर उताऱ्याने १२ लाख ५६ हजार ७६८ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत १४ लाख ६५ हजार ७५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

आर्थिक गणिते कोलमडली

ऊसतोडणी कामगार हा मुकादमाकडून उचल घेताना सहा महिने ऊस हंगाम चालेल आणि घेतलेली सर्व उचल फुटेल या हिशेबाने घेत असतो; मात्र गळीत हंगाम लवकर बंद झाल्याने अनेक ऊसतोडणी कामगारांच्या उचली फिटल्याच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उचलीचे वाटप करणारे मुकादम हे आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

परिसरात शुकशुकाट होणार

कारखाना सुरू होताना आठ ते दहा हजारांच्या आसपास ऊसतोडणी कामगार कारखान्यांवर येत असतात. त्यामुळे परिसरातील हॉटेल, किराणा, केशकर्तनालाय, दवाखाने, मेडिकल व्यावसायिकांना चांगले दिवस येतात. या ठिकाणावरून ऊसतोडणी कामगार निघून गेले की, उद्योग, व्यावसायिकांना देखील आर्थिक फटका बसत असतो.

Web Title: What should I go to the village to eat Should we lie down in front of the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.