अहो आश्चर्यम्! विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा स्वस्त; नेमकं काय आहे प्रकरण पाहा तुम्हीच...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 07:09 PM2021-02-16T19:09:18+5:302021-02-16T19:23:33+5:30
... तर या घडीला पेट्रोल अन् डिझेल १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकते...
पुणे : कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत सापडला होता. त्यात भर म्हणजे आता दिवसागणिक होणाऱ्या इंधनातील दरवाढीने सगळेच जण पुरते हैराण झाले आहे. पेट्रोल शंभरीचा पल्ला पार करतेय की काय अशी धाकधूक मनात असताना डिझेल देखील ८५ रुपयांच्या घरात पोहचले आहे. याच पार्श्वभूमीवर जर तुम्हाला विमानाचं इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा स्वस्त आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती वाटेल. पण ही सत्य परिस्थिती आहे. विमानाचे इंधन ट्रकच्या इंधनापेक्षा तब्बल ४०% ने स्वस्त असल्याची माहिती समोर येत आहे. काय आहे हा प्रकार पाहुयात...
आजमितीला विमानांना लागणाऱ्या इंधनावर केंद्र सरकारचे कर अत्यंत कमी आहेत आणि पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा सेस तर बिलकूल नाही. परवाच्या केंद्रीय बजेटमध्ये जाहीर झालेला कृषी अधिभार सुध्दा फक्त पेट्रोल व डिझेलवर आकारण्यात आला आहे, जो विमानाच्या इंधनावर देखील लावला गेलेला नाही. परिणामी ट्रकच्या इंधनापेक्षा विमानाचे इंधन ४०% ने स्वस्त म्हणजे ५५ रुपये प्रति लिटर इतका आहे. त्याच धर्तीवर विकासकामांसाठी कर देण्याचा भार पेट्रोल- डिझेल वापरणाऱ्या सर्व़सामान्य नागरिकांवर आणि वाहतूकदारांवरच का लावला जातो ? विमानाने प्रवास करणारे त्यांच्यापेक्षा गरीब आहेत का ? असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे.
विवेक वेलणकर म्हणाले, महाराष्ट्र राज्य सरकारचा व्हॅट विमानाच्या इंधनावर डिझेलवर लावलेल्या व्हॅट पेक्षा जास्त असूनसुद्धा दरांमध्ये ही तफावत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान डिझेलवरील कर व अधिभार विमानाच्या इंधनावर लागणाऱ्या करांच्या पातळीवर आणणे आवश्यक आहे. पेट्रोल आणि डिझेलवर खूप टॅक्सचा भार आहे.
साधारण पेट्रोल वर ६० रुपये तर डिझेलवर ५४ रुपयांचा कर आकारला जात आहेत. त्याप्रमाणात विमानाच्या कुठल्या इंधनावर अधिभार लावण्यात आलेला नाही. विमानाचं इंधन स्वस्त आणि माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रक, बसेसचं इंधन महाग ही कुठेतरी विसंगती आहे असेही मत वेलणकर यांनी यावेळी व्यक्त केले.
... तर या घडीला पेट्रोल अन् डिझेल १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकते...
केंद्राचा पेट्रोलवरचा टॅक्स साधारण ३३ रुपये आणि राज्य सरकारचा २७ रुपये आहे. त्यामुळे दोघांनीही हे कर कमी करायला हरकत आहे. मात्र, डिझेलच्या बाबतीत ही परिस्थिती वेगळी आहे. कारण डिझेलवर केंद्राचा तीस ते साडे एकतीस अधिभार असून राज्य सरकारचा फक्त २० रुपये आहे. त्यामुळे याबाबतीत केंद्राचा टॅक्स कमी करणे गरजेचे आहे. परंतु, गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोलवर १३ रुपये आणि डिझेलवर १६ रुपये दर वाढविले. यामुळे केंद्र आणि गेल्या वर्षभरातील वाढविलेले कर कमी दोघांनीही केले तर आज या घडीला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती १६ ते २० रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.
- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच