काय मौसम, काय मूड... जस्ट चिल आऊट यार; पुण्यात 'या' पावसाळी पर्यटनाला तरुणाईची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 10:26 AM2023-07-19T10:26:40+5:302023-07-19T10:27:01+5:30

सगळ्या बाजूंनी डोंगरदऱ्या, मस्त गुलाबी धुकं, हिरवीगार झाडी अशा कुंद वातावरणात तरुणाईचा ‘वन डे रिटर्न’ ट्रीपकडे जास्त ओढा

What the weather whats the mood just chill out man In Pune Ya monsoon tourism is preferred by the youth | काय मौसम, काय मूड... जस्ट चिल आऊट यार; पुण्यात 'या' पावसाळी पर्यटनाला तरुणाईची पसंती

काय मौसम, काय मूड... जस्ट चिल आऊट यार; पुण्यात 'या' पावसाळी पर्यटनाला तरुणाईची पसंती

googlenewsNext

राधिका वळसे पाटील / सानिका बापट

पुणे : पावसाळा म्हटलं की तरुणांच्या भाषेत वाढीव कार्यक्रम. धबधबे, डोंगर, थंड हवा, धुके, पावसाची रिमझिम आणि बरसणाऱ्या सरी असा नादखुळा माहोल. अशा काय मौसम, काय मूड... या वातावरणात ‘चिल’ मारण्यासाठी तरुणाईची पावसाळी पर्यटनाला पसंती असते. पुण्याजवळ अशी अनेक ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर तरुणाईची झुंबड पाहायला मिळत असून, ते पावसात चिंब होत एन्जॉय करण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत.

सगळ्या बाजूंनी डोंगरदऱ्या, मस्त गुलाबी धुकं, हिरवीगार झाडी अशा कुंद वातावरणात तरुणाईचा ‘वन डे रिटर्न’ ट्रीपकडे जास्त ओढा आहे. पुण्याच्या आसपासचे माळशेज घाट, भीमाशंकर मंदिर, ताह्मिणी घाट, माथेरान, मुळशी, पवना धरण, महाबळेश्वर, कासारसाई धरण, देवकुंड धबधबा, कुंड मळा, कामशेत, लोणावळा, पानशेत, खडकवासला या ठिकाणांवर तरुणांचे लोंढे एन्जॉय करताना दिसत आहेत.

यासह लवासा सिटी, पवना धरण, पुण्यातील किल्ले, कासर्साई धरण, कामशेत, खडकवासला धरण, पानशेत धरण, सिंहगड, मुळशी, माथेरान इत्यादी. ठिकाणे तरुणाईसाठी प्रसिद्ध आहेत.

रोमँटिक ताह्मिणी घाट
(पुण्यापासून ५३ किमी)

सह्याद्रीच्या कुशीतील ताह्मिणी घाट हे तरुणाईचं ‘फर्स्ट लव्ह’ आहे. ठिकठिकाणी ओसंडून वाहणारे धबधबे, धुक्याचे कुंद पांघरूण, त्या पांघरुणातून मधूनच डोकावणारी सूर्याची किरणे, पावसाची आल्हाददायक रिमझिम, वळणाचे रस्ते, बेभान वारा आणि त्यासोबत गरमागरम चहा आणि भजी किंवा भाजून तिखट-मीठ लावलेले कणीस यामुळे ताह्मिणी घाटाला तरुणाईची पहिली पसंती आहे.

कसे जाल? - चारचाकी, दुचाकी.
काय खाल? - वाफाळलेला चहा, भाजलेले कणीस, मॅगी.

मनमोहक लोणावळा

(पुण्यापासून ६७ किमी)
ताह्मिणी घाटानंतर महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वोत्तम पर्यटनस्थळ म्हणजे लोणावळा. समुद्रसपाटीपासून ६२५ मी. एवढ्या उंचीवर वसलेले हे ठिकाण आहे. जागोजागी नयनरम्य धबधबे, मनमोहक तलाव, किल्ले आणि निसर्गसंपन्न वातावरणाचा मनमुराद आनंद घेता येतो. राजमाची पॉईंट, भुशी धरण, टायगर पॉईंट, पवना लेक, कार्ला-भाजे लेणी आणि लोहगड किल्ला ही त्यातली सर्वांत आवडती ठिकाणे आहेत. विशेष आकर्षण-पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग
कसे जाल? - दुचाकी, चारचाकी, ट्रेन.

काय खाल? - वडापाव, कांदाभजी, मिसळ, चिक्की, कॉर्न भजी, इ.

कुंद माळशेज घाट
(पुण्यापासून १२८ किमी)

निसर्गसौंदर्य आणि कुंद वातावरणाने पर्यटकांना आकर्षित करणारा माळशेज घट हे ही तरुणाईचे आवडते ठिकाण आहे. घनदाट जंगल, खोल दऱ्या, डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे व औषधी वनस्पतींची रेलचेल असलेले डोंगर हे इथलं आकर्षण. दऱ्यांमधील जंगलांमुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, हरीण, कोल्हा, बिबट्या यांचे दर्शन होते.

विशेष आकर्षण - जलाशयातील रोहित पक्षी (फ्लेमिंगो)
कसे जाल? - रेल्वे, दुचाकी, चारचाकी

काय खाल? - चहा, भजी, मटक्यातले दही, भाजलेले कणीस, पिठलं भाकरी.

पवित्र भीमाशंकर
(पुण्यापासून १०० किमी)

नैसर्गिक सौंदर्याने वेढलेले धार्मिक ठिकाण म्हणजेच भीमाशंकर. हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पावसाळ्यात निसर्गप्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. सुंदर फुले, निसर्गरम्य वातावरण, घनदाट जंगल, धुक्याने वेढलेला परिसर, ढगांच्या सान्निध्यात वावरणारे पर्यटक यासाठी हे प्रसिद्ध आहे.

विशेष आकर्षण - वन्यजीव अभयारण्य
कसे जाल? - दुचाकी चारचाकी, बस.

काय खाल? - मासवडी, पिठलं भाकरी, लसणाची चटणी - भाकरी, कांदा भजी, मिसळ इ.

‘चिल्ड’ महाबळेश्वर
(चौकट - पुण्यापासून ११७ किमी)

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर हे राज्यातील सर्वाधिक पसंतीचे ‘हिल स्टेशन’ आहे. हिरवा निसर्ग, ‘चिल्ड’ वातावरण, सुंदर बगीचे, श्वास रोखायला लावणारी दृश्ये व अनेक सुंदर प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. रायगड, तोरणा या किल्ल्यांचे अतिशय मनमोहक दृश्य येथून दिसते. याच मार्गावर टायगर स्प्रिंग, इको पॉइंट, मॅप्रो गार्डन ही इथली वैशिष्ट्ये आहेत.

विशेष आकर्षण - एल्फिन्स्टन पॉइंट, सनसेट पॉइंट.
कसे जाल? - दुचाकी, चारचाकी, बस.

काय खाल? - स्ट्रॉबेरी, बेरी विथ क्रीम, कॉर्न पॅटीस, भरलेले वांग आणि भाकरी, चना गरम इत्यादी.

तुमची धम्मालही शेअर करा

तुम्हीही मित्रांसोबत आऊटिंगला गेला असालच. तुम्ही भेट दिलेल्या स्पॉटविषयी नेमकी माहिती २०० शब्दांत आणि तुमच्या अशा ट्रीपचे फोटो आमच्यासोबत शेअर करा. त्यातील निवडक अनुभवांना फोटोसह प्रसिद्धी देण्यात येईल. माहिती आणि फोटो ९८८१०९८४३५ या नंबरवर पाठवावेत.

Web Title: What the weather whats the mood just chill out man In Pune Ya monsoon tourism is preferred by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.