गॅस लिकेज झाला तर काय कराल? दोन वर्षातून एकदा करा गॅस चेक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 09:19 AM2022-09-27T09:19:21+5:302022-09-27T09:21:28+5:30
गॅस सिलिंडरची सुरक्षा कशी ठेवाल?...
पिंपरी : स्वयंपाकघरात आपण सगळेच एलपीजी गॅस वापरतो. नेहमी गॅस वापरणारे आपण त्याबाबत मात्र जागरुक असल्याचे दिसत नाही. गॅसबाबत काही समस्या उद्भवली तर आपण तो दुरुस्तीसाठी संबंधित एजन्सीच्या मेकॅनिकलला बोलावतो. मात्र मोठी दुर्घटना टाळण्यासाठी गॅस हा वर्षातून किंवा दोन वर्षातून एकदा तरी तपासून घ्यायला हवा, असे गॅस कंपन्यांसह एजन्सीचा नियम आहे.
दोन वर्षातून एकदा करा गॅस चेक
गॅस कुठे लिकेज होत नाही ना, हे ठराविक दिवसांनी तपासणे आवश्यक आहे, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो. गॅस कार्डवर हेल्पलाईनचा नंबर असतो. त्यावर फोन करून लगेच लिकेज तपासून घ्यावे. कारण सिलिंडर ओट्याखाली असतो. तसेच त्यांची नळी कुठेही खराब होऊ शकते. तुटलेली असू शकते. त्यामुळे गॅसची नियमित तपासणी करणे करणे आवश्यक आहे.
गॅस लिकेज झाल्यास या हेल्पलाईनवर करा फोन
एलपीजी संबंधित कोणतीही समस्या सोडविण्यासाठी भारत सरकारद्वारे वर्षभर २४ तास सात दिवस सेवा देणारी १९०६ हा आपत्कालीन हेल्पलाईन सुरू केली आहे. भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन कंपन्या व आपत्कालीन सेवा कक्षाचा हा संयुक्त उपक्रम आहे. तसेच विविध कंपन्यांच्या कार्डवरही टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक दिलेले आहेत. त्यावरही आपत्कालीन काळात संपर्क करावा.
शहरात ६ लाख गॅस ग्राहक
पिंपरी - चिंचवड शहरातील लोकसंख्या सुमारे २७ लाख आहे. शहरातील सर्वच कुटुंब गॅसचा वापर करतात. त्यानुसार शहरातील गॅस ग्राहकांची संख्या सुमारे ६ लाख (अंदाजे) असल्याचे गॅस एजन्सी चालकांनी सांगितले.
गॅस सिलिंडरची सुरक्षा कशी ठेवाल?
सिलिंडरच्या रिंगवर सिलिंडरची तपासणी तारीख लिहिलेली असते. ती पाहून घ्या. सील तोडून सेफ्टी कॅप काढून हाताची करंगळी सिलिंडरच्या तोंडात घालून आत व्हॉल्व्ह आहे की नाही हे पाहा. जमत नसल्यास कर्मचाऱ्याला तपासण्यास सांगा. पुन्हा सेफ्टी कॅप लावूनच ठेवा.
स्वयंपाक करताना शेगडी मागे-पुढे सारली जाते. त्यामुळे लूज होत असल्याने ती नियमित तपासावी. गॅस पाईप योग्य वेळी बदलत राहा. घराबाहेर पडताना, झोपताना रेग्युलेटर बंद करा.
लिकेज आहे असे वाटल्यास..
गॅस लिकेज झाला असे वाटल्यास घराची खिडक्या, दारे त्वरित उघडावीत. लिकेज असल्यास वास येतो. सगळ्यात आधी रेग्युलेटर चेक करा. तो सुरू असेल तर लगेच बंद करा. गॅसच्या वासाची शंका आली तर काडीपेटी लावू नका. दिवा जळत असेल तर तो आधी बंद करावा. सिलिंडरचा नॉब बंद करावा. गॅस कुठून लिकेज होतो ते तपासून घ्या.
- मानव कांबळे, गॅस एजन्सीचालक, सामाजिक कार्यकर्ते