फडणवीसांच्या दौऱ्यातून काय साध्य होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:14+5:302021-02-11T04:13:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुुरुवारी ( दि. ११) पुणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गुुरुवारी ( दि. ११) पुणे महापालिकेत आढावा बैठक घेणार आहेत. गेल्या चार वर्षांतील विकासकामांच्या सद्यस्थितीची माहिती ते घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन चार वर्षे झाली. यातली सुमारे दोन वर्षे फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते. फडणवीस यांनी शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे नवे प्रकल्प आणले आणि काही प्रकल्पांना गती दिली. या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस येत असल्याचे मोहोळ म्हणाले.
फडणवीस यांच्या भेटीने पालिकेच्या रखडलेल्या योजना आणि कामांना ‘बुस्टर’ मिळणार का, असा प्रश्न आहे. सन २०१४ मध्ये राज्यात आणि देशात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर सन २०१७ मध्ये पुणे महापालिका इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने जिंकली. त्यानंतर शहराचा विकास आराखडा, समान पाणीपुरवठा योजना, ई-बस खरेदी, भामा आसखेड पाणीपुरवठा, मेट्रो, स्मार्ट सिटी आदी योजना, प्रकल्पांची धामधूम उडवून देण्यात आली. मात्र अपवाद वगळता या प्रकल्पांची गती समाधानकारक राहिलेली नाही.
त्यातच २०१९ मध्ये राज्यातली भाजपची सत्ता गेली तर २०२० मध्ये कोरोना महामारी आली. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर परिणाम झाला. भाजपाने प्रतिष्ठेचे केलेले नदी सुधार, एचसीएमटीआर, कचरा मुक्त पुणे असे प्रकल्प संथ झाले. काही प्रकल्पांच्या निविदा वाढीव दराने आल्याने विरोधकांकडून भ्रष्टाचाराचा आरोप झाला. गेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आलेले अन्य पक्षातील भाजपाचे काही नगरसेवक पुन्हा त्यांच्या मूळ पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आल्याने चिंता वाढली आहे. शहरातील जुने नेते अडगळीत पडल्यानेही नाराजी असल्याचे सांगितले जाते. उपमहापौर पदावरून मित्र पक्ष रिपब्लिकन पक्षाने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून फडणवीस महापालिकेत येत असल्याचे सांगितले जाते. पालिकेतील हातची सत्ता जाऊ नये यासाठी भाजपा ताकदीने कामाला लागली आहे. दोनच आठवड्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालिकेतील प्रकल्पांचा आढावा घेतला होता.