२८ हजार उमेदवाराचं काय होणार? पुणे महापालिकेची कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रखडली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 10:10 AM2024-11-27T10:10:59+5:302024-11-27T10:11:27+5:30
विधानसभेनंतर ही भरती पुन्हा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकू नये, त्यासाठी ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करावी, उमेदवारांची मागणी
पुणे: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाची भरती मराठा आरक्षणाचा समावेश, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची लागलेली आचारसंहिता यामुळे भरती प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे गेल्या आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेली कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेने ११३ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरतीसाठी जाहिरात काढली होती. त्यासाठी 'आयबीपीएस' या संस्थेच्या माध्यमातून मार्च महिन्यात यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. २८ हजार ७०० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. याच काळात राज्य सरकारने मराठा समाजासाठी शासकीय नोकर भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, त्यामुळे या आरक्षणाचा समावेश करावा की नाही याबाबत महापालिकेने नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यावर सरकारकडून लगेच महिनाभरात मराठा समाजासाठी 'एसईबीसी' या प्रवर्गातून १० टक्के आरक्षण उपलब्ध करून देण्याची सूचना केली आहे.
लोकसभा आणि विधानसभेची लागलेली आचारसंहिता यामुळे या पदाच्या भरतीसाठीचीऑनलाइन परीक्षा न झाल्याने भरती प्रक्रिया कधी होणार असा सवाल केला जात आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पोषक वातावरण असल्यामुळे महापालिका निवडणुका पुढील वर्षात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकू नये. त्यासाठी ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर करावी अशी अपेक्षा या पदासाठी अर्ज केलेले उमेदवार व्यक्त करत आहेत.