एक साडी की किमत तुम क्या जानोगे..ड्रायक्लिनर्स बाबू!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 07:54 PM2019-10-16T19:54:57+5:302019-10-16T20:01:52+5:30
इस्त्रीवाल्याला तक्रारदार महिलेला द्यावे लागले साडीचे पैसे..
पुणे : इस्त्री करण्यासाठी दिलेली साडी खराब करून दिल्याप्रकरणी तक्रारदाराला विरुद्ध पक्षाने पाच हजार रुपये आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला. मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्य क्षितीजा कुलकर्णी, संगीता कुलकर्णी यांनी हा निकाल दिला.
तक्रारदार हे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. मार्च २०१८ मध्ये ग्राहक मंचाकडे त्यांनी हा दावा दाखल केला होता. तक्रारदाराने डीलक्स डायर्स, ड्रायक्लीनर अॅण्ड स्पेशल वॉशर्स, प्रशांतनगर, नवी पेठ, वानोरी शाखा मॅनेजर प्रविण कडू, शुभांगी थोरात, मनोज कक्कर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता. तक्रारदाराने स्वत: मंचापुढे हा दावा चालविला. ग्राहक संरक्षण कायदा कलम १९८६ चे कलम १२ नुसार हा दावा दाखल केला होता.
तक्रारदार हे माजी लष्करी अधिकारी आहेत. ते हडपसर परिसरात राहतात. एप्रिल २०१७ मध्ये तक्रारदाराच्या पत्नीने डीलक्स ड्रायक्लीनर्सकडे सिल्क क्रेप साडी इस्त्रीसाठी दिली होती. ही साडी नवीन होती त्यात कोणताही दोष नव्हता. तक्रारदार हे त्यांच्या पत्नीबरोबर साडी घेण्यासाठी डीलक्स ड्रायक्लीनर्सच्या वानवडी शाखेत गेले. मात्र तेव्हा त्यांना लक्षात आले की, संपूर्ण साडीवर तपकीरी रंगाचे डाग पडले आहेत. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले की, साडीच्या घड्यांमध्ये तपकिरी रंगाचा कागद ठेवल्यामुळे असे डाग पडले आहेत. ते काढण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे तक्रारदार व त्यांची पत्नी परत मे २०१७ मध्ये साडी आणण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना त्याच प्रकारचे डाग साडीवर असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांना संबंधित शाखा मॅनेजरने डीलक्सच्या मालकांबरोबर बोला, असे सांगितले. त्यानंतर तक्रारदाराच्या पत्नीने डीलक्सच्या शुभांगी थोरात यांच्याकडे संपर्क साधला.
त्यानंतर जून २०१७ मध्ये त्या परत साडी घेण्यासाठी गेल्या असता, त्यांना साडीवर छोटी छिद्रे पडल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत संबंधित मॅनेजरकडे पुन्हा चौकशी केली असता, त्याने केमिकलच्या वापरामुळे आणि घासल्यामुळे छिद्रे पडल्याचे सांगितले. साडी पूर्ण खराब झाली होती. साडीची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तक्रारदाराने मंचाकडे दावा दाखल केला. विरुद्ध पक्षाचे मनोज कक्कर यांनी याप्रकरणी लेखी जबाब सादर करून आरोप नाकारले. डीलक्सचे मालक मनोज कक्कर आहेत. तर थोरात या कर्मचारी आहेत, हे दाखल केलेल्या कागदपत्रावरून स्पष्ट होत असल्याचा अर्ज तक्रारदाराने सुनावणीदरम्यान केला.
तक्रारदार व त्यांच्या पत्नीने साडी कधी व किती रुपयांना खरेदी केल्याचा पुरावा सादर केला नाही. मात्र तक्रारीत त्यांनी साडीची किंमत ७,५०० आणि ंब्लाऊजची किंमत २,५०० रुपये असल्याचा उल्लेख केला आहे. इस्त्री करण्यासाठी दिलेल्या साडीची किंमत मध्यम स्वरूपाची असेल, असे गृहित धरण्यात येते. तक्रारादाराला पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई व मानसिक त्रासापोटी दोन हजार रुपये द्यावेत, असा निकाल ग्राहक मंचाने दिला.