दुर्घटना घडल्यानंतरचे शहाणपण काय कामाचे?

By admin | Published: June 29, 2015 06:33 AM2015-06-29T06:33:42+5:302015-06-29T06:33:42+5:30

मालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

What is the wisdom of the accident after the accident? | दुर्घटना घडल्यानंतरचे शहाणपण काय कामाचे?

दुर्घटना घडल्यानंतरचे शहाणपण काय कामाचे?

Next

संजय माने
मालाड मालवणी येथे विषारी दारू पिल्याने शंभरहून अधिक लोकांचा बळी गेला. त्यानंतर राज्यभर पोलिसांची धावपळ उडाली. ठिकठिकाणच्या दारूभट्ट्या उद््ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. पिंपरी-चिंचवडमधील पोलीसही त्यास अपवाद ठरले नाहीत. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यापेक्षा अगोदरच पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून अशा जीवघेण्या हातभट्ट्या उभ्या राहणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. दुर्घटना घडल्यानंतर उशिरा सुचणारे शहाणपण काय कामाचे, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
दारूनिर्मितीसाठी आवश्यक रसायनसाठा असलेल्या ठिकाणी निराधारनगरमध्ये दोन वर्षांपूर्वी ठिणगी पडून आग लागली. झोपड्या आगीत खाक झाल्या. तेथील महिला, रहिवासी भाजले. दारूसाठ्याच्या ठिकाणी छापा टाकण्यास गेलेले उत्पादन शुल्क विभागाचे दोन कर्मचारीसुद्धा आगीत भाजून मृत्युमुखी पडले. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर अशा बेकायदा दारूभट्ट्या, हातभट्टी दारूनिर्मितीचे अड्डे पिंपरी-चिंचवडमधून तेव्हाच हद्दपार होणे आवश्यक होते. मालवणी अथवा राज्यात अन्य ठिकाणी विषारी दारू दुर्घटना घडावी, नंतर कारवाईची पावले उचलावीत, अशी येथील पोलिसांना प्रतीक्षा करण्याची काही गरज नव्हती.
मालवणीतील दुर्घटनेनंतर विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांवर गुन्हे दाखल केले. मुद्देमाल जप्त केला. परंतु, त्या ठिकाणी पुन्हा काही दिवसांतच दारूभट्ट्या सुरू होतील. आणखी कोठे तरी दुर्घटना घडून येईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले जाईल, हे सर्वांना ज्ञात झाले आहे.
विषारी दारूने अनेकांचा बळी जातो. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संसार उघड्यावर पडतात. केवळ विषारी दारूच्या दुर्घटनाच नव्हे, तर असे अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. त्यातही अनेकांचे बळी जात आहेत. संसार उद्ध्वस्त होत आहेत. ते रोखण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का? असा मुद्दा या अनुषंगाने उपस्थित झाला आहे. मटका, जुगाराच्या अड्ड्यांवर खुनी हल्ल्याच्या घटना घडतात. अनेकदा खूनही पडतात. अनेक जण जुगारात हरतात. संसाराची वाताहात होते . समाजहिताला बाधा आणणारे हे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणेला कशाची प्रतीक्षा आहे?
असे प्रकार सुरू असल्याची माहिती बाळगणारे, अवैध धंदे बंद करा, अशी मागणी करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते यांच्या नावाच्या याद्या मटकेवाल्यांकडे जमा होतात. त्यांना वेळचेवेळी हप्ते मिळतात. कोणी आवाज उठवीत नाही, कोणाची तक्रार नाही, म्हणून पोलीससुद्धा काही करीत नाहीत.

 

Web Title: What is the wisdom of the accident after the accident?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.