'' साहेब '' काही ऐकेना, निबंधात काय लिहावे सुचेना: पुणे पोलिसांची डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 11:07 AM2019-08-21T11:07:43+5:302019-08-21T11:22:29+5:30
वरिष्ठ साहेबांच्या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असणाऱ्या पोलिस निबंध स्पर्धेमुळे उत्साहाऐवजी अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे : शहरात भागात घरफोड्या, दरोडे, तोतया, मारहाणीचे गुन्हे वाढले असताना दुस-या बाजुला पोलिस प्रशासन पोलिसांमधील सेवा जाणीव वाढावी यासाठी ‘निबंध’ स्पर्धा घेण्यावर भर देत आहे. पोलिसांंमधील उत्साहाला आणि कार्यक्षमतेला वाव मिळावा यासाठी निराळया पध्दतीचे ‘पोलिसिंग’करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. मात्र या सगळयात वरिष्ठ साहेबांच्या आदेशामुळे गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असणाऱ्या पोलिस निबंध स्पर्धेमुळे उत्साहाऐवजी अनेकांची डोकेदुखी वाढली आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून पुणे शहर पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात कर्तव्याप्रती जागरूकता आणि सेवा भावाची जाणीव उत्साह निर्माण होण्याकरिता या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस माझा अभिमान, खाकी माझी शान आणि कर्तव्य दक्षतेतून लोकांच्या हदयात असे विषय निबंध लेखनाकरिता निवडण्यात आले आहेत. याकरिता 30 पोलीस स्टेशन, गुन्हे शाखेतील 5 युनिट व 1 भरोसा सेल, सायबर व आर्थिक गुन्हे शाखा, वाहतुक विभागातील पाच परिमंडळ, विशेष शाखा 1 व 2 आणि मुख्यालय यातील एकूण 51 संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. विविध पोलीस स्टेशन त्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक यांना आपल्या कार्यालयात असणा-या कर्मचा-यांकडून निबंध लिहून घेतील. तसेच पोलीस स्टेशन, शाखा आणि मुख्यालय स्तरावरील एखादी व्यक्ती परीक्षक म्हणून काम पाहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने काढलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पोलीस शिपाई ते सहायक पोलीस आयुक्त यांच्याकरिता आयोजिली आहे. त्यांनी पोलीस दलात काम करताना आलेल्या अनुभवावरुन पत्रकात नमुद केलेल्या एका विषयावर 200 ते 250 शब्दांत आपले सविस्तर मनोगत स्वहस्ताक्षरात देण्याची अट होती. विशेष म्हणजे बक्षीसपात्र निबंधाचे एक पुस्तक तयार केले जाणार आहे. आयुक्त स्तरावरील बक्षीसपात्र मनोगत लिहीणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार पोलीस आयुक्त यांच्या हस्ते होणार आहे.
* निबंधात काय लिहावे हे कळेना ....
पोलीस दलातील अनुभव आणि त्यावर आधारित नमुद केल्यापैकी एका विषयावर निबंध लिहिण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला मात्र मेंदुला चालना द्यावी लागत आहे. दैनंदिन कामातून वेळ काढून दिलेल्या वेळेत निबंधाचे काम पूर्ण करावयाचे आहे. रोज घडणाऱ्या गुन्हयांचा तपास करायचा सोडून उत्साह आणि जागृतता निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दोघांनाही त्रासदायक ठरला. परंतु साहेबाचे सांगणे, टाळता येईना आणि लिहिण्यात काही सुचेना याची प्रचिती त्यांच्याकडे पाहिल्यावर दिसून आली.