Swargate Case: आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा
By नम्रता फडणीस | Updated: April 1, 2025 18:52 IST2025-04-01T18:50:57+5:302025-04-01T18:52:47+5:30
फलटणला जाण्यासाठी पहाटेपासून दर १ तासाला बस आहे, तरुणी ही वेळोवेळी फलटणला जात असल्याने तिला याबाबत माहिती असूनही अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे

Swargate Case: आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा
पुणे : स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणात अटक केलेला आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी आरोपीच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. शारीरिक संबंध वेळ हा वैद्यकीयरित्या प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असून, पीडितेच्या जबाबानुसार तिने नमूद केलेल्या घटनाक्रमानुसार जबरदस्ती करणे तसेच त्यानंतर संभोग करणे अशक्य वाटते. यावरून हे सिद्ध होते की पीडिता व आरोपी यांच्यात जे काही संबंध झाले हे दोघांच्या संमतीने झाले आणि संमतीने झालेले संबंध हा कुठलाही गुन्हा नाही, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.
दि. २५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट एसटी स्थानकात बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली. पोलिसांनी पथके तयार शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस कोठडीनंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी गाडे याचे वकील वाजिद खान-बिडकर यांनी गाडेच्या जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. पीडितेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की पीडितेच्या बाजूस एक वयस्कर व्यक्ती बसली होती. ती व्यक्ती देखील त्याच बसने प्रवास करणार होती. मग ती व्यक्ती पीडित महिलेसोबत आणि आरोपीसोबत का गेली नाही यावरून या घटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. स्वारगेट या ठिकाणी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे असून, अद्यापही या प्रकरणात हे फुटेज दाखल करण्यात आलेले नाही. या फुटेजवरून आरोपीने कुठल्याही प्रकारची गैरकायदेशीर कृती केली नाही हे सिद्ध होते. याशिवाय स्वारगेट बस डेपोवरून फलटणला जाण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून दर एक तासाला फलटणला जाण्यासाठी बस आहे. फिर्यादी ही वेळोवेळी गावी (फलटण) जात असे आणि म्हणून दर तासाला फलटण साठी गाडी आहे हे माहिती असूनसुद्धा फिर्यादी अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे.