व्हॉट्स अॅपवर ‘चर्चा तर होणारच’
By admin | Published: February 18, 2017 03:48 AM2017-02-18T03:48:43+5:302017-02-18T03:48:43+5:30
‘जब गरीब की थाली में पुलाव आया, तो समझ लेना भारत में चुनाव आया’ किंवा ‘अब की बार, कुणाचेही सरकार, इथे दुपारी
पुणे : ‘जब गरीब की थाली में पुलाव आया, तो समझ लेना भारत में चुनाव आया’ किंवा ‘अब की बार, कुणाचेही सरकार, इथे दुपारी झोपतो मतदार’ अशा मेसेजनी सध्या नागरिकांचा मोबाईल खणखणत आहे. व्हॉट्स अॅप मेसेजच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच, राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून मेसेजमधून प्रचाराचा धुरळा उडत आहे.
रिक्षातून केला जाणारा प्रचार, घरोघरी जाऊन मतदारांची घेतलेली भेट याही पुढे जाऊन व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्ष नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. विरोधकांवर टीका करतानाच, स्वत:ची बाजू पटवून देणारे
मेसेज, तसेच जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन व्हॉट्स अॅप मेसेजच्या माध्यमातून केले जात आहे.
आश्वासनांची खैैरात, प्रचारी भाषणांबरोबरच मेसेजचे माध्यम परिणामकारक ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मेसेजमध्ये स्वत:चा प्रचार आणि विरोधकांवर टीका करण्यासाठी आकर्र्षक वाक्यांचा वापर केला जात आहे.
‘आता ही अफवा कोणी पसरवली की निवडणूक चिन्ह बदलले आहे’, ‘हे बटन दाबून बघा, तुम्हाला तुमच्या हक्काचा उमेदवार मिळेल’, ‘आयडियाचा टॉवर आणि शिवसेनेची पॉवर फुलच मिळणार’ अशा मेसेजची नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मेसेजच्या माध्यमातून पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर असा कलगीतुराही रंगत आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून मारलेल्या कोपरखळ्या चांगलेच मनोरंजन करत आहेत.
महानगरपालिका निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. या सभेतील नेत्यांची वक्तव्येही मेसेजच्या माध्यमातून चर्चिली जात आहेत. ‘मुळा-मुठेचे नाव बदलून टाका’, ‘पुण्याला स्मार्ट कसे करणार? आम्ही स्मार्टच आहोत’, ‘नोटा’बंदी केली तरी मतदानासाठी ‘नोटा’च वापरणार’, ‘प्रचारसभेचा नवीन फंडा’ अशा मेसेजमधून निवडणुकीमध्ये वेगळेच रंग भरले आहेत.
निवडणूक प्रचाराला व्हॉट्स अॅप मेसेजमुळे हायटेक रंग चढला असला, तरी हा फंडा प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कितपत उपयोगाला येणार, अशी चर्चाही उमेदवार तसेच मतदारांमध्ये होत आहे. मेसेजकडे बरेचदा केवळ करमणूक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यातून केवळ मनोरंजन होणार की मतदारांचे मतपरिवर्तन होणार, याची प्रचिती निकालानंतरच पाहायला मिळेल, असे मत व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)