चाकण बाजारात भाज्या मातीमोल; पावसामुळे शेपू व कोथिंबिरीचे भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:36 AM2018-08-19T01:36:27+5:302018-08-19T01:37:30+5:30
बाजारात भाज्यांचे ढीग पडून, भाज्या फेकून दिल्या
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी बाजारात पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. पावसामुळे पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेपू, मेथी, पालक व कोथिंबिरीचे भाव गडगडल्याने बाजारात भाज्यांचे ढीग पडून होते. अक्षरश: भाज्या मातीमोल झाल्या.
मेथी, शेपू, कोथिंबीर भाज्या एक ते दोन रुपयाला दोन-दोन गड्ड्या मिळत होत्या. ५० पैसे व एक-दोन रुपये भाव मिळाल्याने कोथिंबिरीचे ढीग बाजारातच सोडून दिले. उत्पादन खर्चही निघत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. पावसामुळे बाजारात पालेभाज्या व कोथिंबिरीला उठाव नव्हता. पावसाने कोथिंबिरी व पालेभाज्या भिजून खराब झाल्या असून बाजारात सोडून दिलेल्या भाज्यांच्या ढिगावर अक्षरश: जनावरांनी ताव मारला.
तरकारी बाजारात कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, बिन्सचे भाव कोसळल्याने याही भाज्या बाजारात सोडून दिल्या. या फळभाज्यांना २ ते ५ रुपये इतका कमी भाव मिळाल्याने या फळभाज्या शिल्लक राहिल्या. शिल्लक राहिलेल्या परंतु चांगल्या प्रतवारीच्या भाज्या अडत्यांनी उद्याच्या विक्रीसाठी झाकून ठेवल्या आहेत.