गव्हाच्या पेरण्या लांबल्या
By admin | Published: November 27, 2015 01:31 AM2015-11-27T01:31:52+5:302015-11-27T01:31:52+5:30
दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी झालेला पाऊस, धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली
राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांत दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी झालेला पाऊस, धरणांतील पाणीसाठाही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली, गेले महिनाभर महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे शेतीपंपासाठी न मिळालेला वीजपुरवठा, अवकाळी पावसामुळे हवामानातील झालेला बदल, त्यामुळे लांबलेली थंडी आणि आडसाली ऊस तोडून जाण्यात होणारा विलंब या सर्व बाबींमुळे राजेगाव परिसरातील गव्हाच्या पेरण्या लांबल्या आहेत.
सर्वसाधारणपणे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असणाऱ्या गव्हाच्या पेरण्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच प्रामुख्याने केल्या जातात. परंतु, नोव्हेंबर महिना संपत आला, तरी कुठेही गव्हाच्या पेरण्या झालेल्या दिसत नाहीत. गव्हाच्या पिकाऐवजी कमी पाण्यात येणारे हरभरा पीक घेण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
पावसाचे प्रमाण घटले
या वर्षी या भागात दर वर्षीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरी, कूपनलिका यांचे जलस्रोत म्हणावे असे भरलेले नाहीत, तर उजनी धरणातील पाणीसाठाही अत्यंत कमी असल्याने व तोही आता पिण्यासाठीच राखीव ठेवण्याच्या सुरू झालेल्या हालचाली यामुळे या वर्षी गव्हाच्या पेरण्या करण्याचे धाडस या भागातील शेतकरी करत नसल्याचे चित्र आहे.
महावितरणच्या तांत्रिक बिघाडामुळे गेले महिनाभर शेतीपंपासाठी वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. या भागातील शेतीपंपासाठी वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रात (दि.४) नोव्हेंबरपासून ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावांतील शेतीपंपासाठी फक्त २ ते ३ तासच वीजपुरवठा होत होता. सुरळीत वीजपुरवठा होऊन पाण्याअभावी या भागातील गव्हाच्या पेरण्या लांबल्या असल्याचे चित्र आहे.
सर्वसाधारणपणे गव्हाच्या पिकाला ४ ते ५ वेळा पाणी द्यावे लागत आहे. त्यातच यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची कमतरता आहे. परिणामी, पाण्याची उपलब्धता पाहूनच गव्हाची पेरणी करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच करतात. १५ डिसेंबरपर्यंतच पेरणी करावी, नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.
- अप्पासाहेब खाडे,
दौंड कृषी मंडल अधिकारी