बहिणीसाठी भाऊ पेटून उठतो तेव्हा...; पद्मश्री मिळालेल्या सय्यदभाईंच्या संघर्षाची कहाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 06:24 AM2020-01-26T06:24:31+5:302020-01-26T06:34:39+5:30
ही गोष्ट आहे सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाईंची.
पुणे : जोवर आपल्याला एखाद्या गोष्टीचा फटका बसत नाही तोवर कोणत्याही बदलाला सुरुवात होत नाही. पुण्यात राहणाऱ्या सय्यद मेहबूब यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली आणि त्यातून त्याने अशी प्रेरणा घेतली की देशाला दखल घ्यावी लागली. आणि कायदाही करावी लागला.
ही गोष्ट आहे सय्यद मेहबूब उर्फ सय्यदभाईंची. मुस्लीम सत्यशोधक समाज मंडळाचे सय्यदभाई उर्फ सय्यद मेहबूब यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेषतः ट्रिपल तलाक कायदा अस्तित्वात यावा यासाठी गेल्या 40 पेक्षा जास्त वर्ष काम केले आणि नुकताच हा कायदा अस्तित्वात आला. धर्माच्या पलीकडे माणुसकीसाठी काम करणाऱ्या सय्यदभाईंच्या कामाची दखल घेऊन त्यांचा गौरव होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहीण खतीजा हिला नवऱ्याने ट्रिपल तलाक दिल्यावर त्यांना पहिला हादरा बसला. त्यांच्यापेक्षा अवघ्या 2 वर्षांनी लहान असलेल्या बहिणीला कोणताही दोष नसताना सोडले ही खंत त्यांना आजही आहे. तिचे पुढे काय होईल, तिच्या दोन मुलांचे भविष्य असे विचार त्यांची पाठ सोडत नव्हते.त्यांनी घरातल्या आणि समाजातल्या व्यक्तींना याविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांच्या म्हणण्याला अनेकांनी विरोध केला, वेड्यात काढले. पण त्यांचा निर्धार पक्का होता. पुढे त्यांना समाजसुधारक हमीद दलवाईंची साथ मिळाली आणि महाराष्ट्रभर मुस्लीम सत्यशोधक चळवळ राबवता आली. आज ट्रिपल तलाक कायदा झाल्यावर ही त्यांचा लढा थांबलेला नाही. उलट महिलांना समानता मिळावी, माणूस म्हणून वागवले जावे यासाठी हा 83 वर्षांचा चिरतरुण अधिक उमेदीने लढणार आहे.
विशेषतः महिलांचे शिक्षण, रोजगार, सुरक्षा असे प्रश्न त्यांना आकर्षित करतात. जगात धर्म नाही तर माणुसकी श्रेष्ठ आहे आणि बदलत्या काळात तेच लक्षात ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. कोणत्याही पद्मश्रीपेक्षा त्यांना माणुसकीचा सन्मान झाला याचा अधिक आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
आज हमीदभाई हवे होते
दलवाई खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याच्या वेडाने झपाटले होते. त्यांच्यासोबत काम करता आले यासारखा आनंद नाही. आज ते असते तर पद्मश्रीचा आनंद अधिक झाला असता. पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला त्याक्षणी पहिली आठवण हमीदभाईंची आल्याची सांगताना त्यांचे डोळे भरून आले होते.