शासकीय रुग्णालय उभारणार कधी?
By admin | Published: December 6, 2014 04:03 AM2014-12-06T04:03:40+5:302014-12-06T04:03:40+5:30
विनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला, तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे
मंगेश पांडे, पिंपरी
विनाथांबा जलद प्रवास होण्यासाठी बांधण्यात आलेल्या पुणे-मुंबई दु्रतगती महामार्गावरून प्रवास जरी कमी वेळेत होत असला, तरीही दिवसेंदिवस अपघाताची संख्याही वाढत आहे. या वर्षात दहा महिन्यांत झालेल्या अपघातांत ३८ जणांना जीव गमवावा लागला आहे. या महामार्गावरील सर्वांत मोठी गैरसोय म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी संपूर्ण महामार्गावर सर्व सुविधांनी युक्त एकही मोठे शासकीय रुग्णालय नाही. यामुळे खासगी रुग्णालयांचे फावले असून, रुग्णांची भरमसाट आर्थिक लूट केली जाते. पुणे-मुंबई ही शहरेअगदी जवळ आली आहेत. दररोज अनेकजण पुणे-मुंबईला ये-जा करतात. अशातच जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूककोंडीच्या समस्येसह अपघातही वाढले. दोन्ही शहरांमधील प्रवास वेळखाऊ होऊ लागला. या सर्व समस्या सुटाव्यात, अपघात कमी व्हावेत यासाठी मोठ्या अपेक्षेने दु्रतगती महामार्ग बांधण्यात आला. मात्र, अपघातग्रस्तांना कमी खर्चात उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालय उभारण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अपघातानंतर जखमीला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असते. हे उपचार खासगी रुग्णालयातूनच मिळावेत, अशीच व्यवस्था केली आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होतो.
या महामार्गावर एकही शासकीय रुग्णालय नाही. दु्रतगती महामार्गावर हवी तशी उपाययोजना न केल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निगडीतील एका खासगी रुग्णालयाच्या पाच रुग्णवाहिका देहूरोड ते लोणावळ्यादरम्यान उभ्या असतात. तसेच लोणावळा ते मुंबईदरम्यान नवी मुंबईतील एका खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका असतात. याव्यतिरिक्त एका खासगी कंपनीच्या तीन रुग्णवाहिका आहेत.