बँकेतूनच चेक चोरीला जातो तेव्हा! १ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 08:47 PM2020-10-21T20:47:37+5:302020-10-21T20:48:47+5:30
कोरोनाची लागण झाल्याने बँकेने सतर्कता बाळगून बँकेत येणाऱ्यांसाठी त्यांचे चेक टाकण्यासाठी ट्रे ठेवला होता....
पुणे : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील बॉक्समध्ये टाकलेला धनादेश दोघा जणांनी चोरुन तो थेरगाव येथील टीजेएसबी बँकेत वटवून १ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत गौरव बलकवडे (वय ३२,रा़ डेक्कन जिमखाना) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलकवडे यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या डेक्कन जिमखाना शाखेत खाते आहे. त्यांनी १० सप्टेबर रोजी बँकेत जाऊन त्यांना मिळालेल्या धनादेश स्लिप भरुन तेथील ट्रेमध्ये ठेवला. बँकेत एकाला कोरोनाची लागण झाल्याने बँकेने सतर्कता बाळगून बँकेत येणाऱ्यांसाठी त्यांचे चेक टाकण्यासाठी ट्रे ठेवला होता. धनादेश वटला का याची विचारणा करण्यासाठी बलकवडे हे बँकेत गेले असताना त्यांना तुमचा चेक मिळालाच नाही, असे प्रथम सांगण्यात आले. त्यानंतर तुमचा चेक बेअरर करुन तो थेरगाव येथील टीजेएसबी बँकेत वटविण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांनी त्याविषयी विचारणा केल्यावर त्यांना बँकेने पोलिसांकडे तक्रार करा, असे सांगण्यात आले. डेक्कन पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्हीची तपासणी केल्यावर बँकेच्या ट्रेमधून दोघा जणांनी चेक चोरुन नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. दरम्यान, बलकवडे यांनी बँकेकडे तक्रार अर्ज केल्यावर बँकेने त्यांचा अर्ज निकाली काढला. पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेऊन दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सी.एम.सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.